महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा उद्घाटन सोहळा बुधवारी (4 जून) पार पडला. उद्घाटन सोहळ्यानंतर हंगामातील पहिला सामना खेळला गेला. गतविजेते रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 195 धावांचे आव्हान सहज पार करत, हंगामाची विजयी सुरुवात केली. तर, दोन वेळच्या विजेत्या रत्नागिरी जेट्सला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोर जावे लागले. नाशिकचा सलामीवीर मंदार भंडारी सामनावीर ठरला.
नाणेफेक जिंकून नाशिकचा कर्णधार प्रशांत सोलंकी याने रत्नागिरीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिला धक्का लवकर बसल्यानंतर धीरज फटांगरे व कर्णधार अझीम काझी यांनी 75 धावांची भागीदारी केली. काझीने 42 धावा बनवल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी छोट्या खेळ्या करत रत्नागिरीला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. सलामीवीर धीरज फटांगरे याने अखेरपर्यंत नाबाद राहत 47 चेंडूंवर 81 धावांची खेळी केली. त्यामुळे रत्नागिरी संघाने 6 बाद 194 अशी मोठी मजल मारली. नाशिक संघासाठी मुकेश चौधरी याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेला 195 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाशिकसाठी मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारत रत्नागिरीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 122 धावांची भागीदारी रचली. अर्शिनने 29 धावांची खेळी केली. त्यानंतर मंदार याने केवळ 48 चेंडूंमध्ये हंगामातील पहिले शतक पूर्ण केले. हे स्पर्धेच्या इतिहासातील त्याचे दुसरे शतक ठरले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला.
मंदार याने 56 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. तर, साहिल 22 चेंडूंमध्ये 5 चौकार व 3 षटकारांसह 46 धावा काढून बाद झाला. रत्नागिरीसाठी एकमेव बळी कर्णधार अझीम काझी याने मिळवला.






