इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलमध्ये प्रथमच सहभागी होत असलेल्या, १०० वर्ष जुन्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने, शनिवारी(१७ ऑक्टोबर) आपल्या संघाचे नवीन नाव आणि नवीन लोगो प्रकाशित केला. ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब यापुढे, स्पोर्टिंग क्लब ईस्ट बंगाल नावाने ओळखला जाईल. या बाबतची अधिकृत घोषणा श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक हरी मोहन बांगर यांनी केली.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, ईस्ट बंगाल क्लबच्या अधिकाऱ्यांनी श्री सिमेंट या नव्या गुंतवणूकदारांसमवेत अंतिम निश्चिती कागदपत्रे आणि मुदत पत्रांवर स्वाक्षरी केल्याने, क्लबचे क्रीडाविषयक हक्क तसेच सर्व मालमत्ता नव्याने स्थापन झालेल्या श्री सिमेंट ईस्ट बंगाल फाउंडेशनकडे हस्तांतरित झाली. नव्या क्लबमध्ये, श्री सिमेंट या कंपनीचे ७६ टक्के समभाग तर, उर्वरित हिस्सेदारी ईस्ट बंगाल क्लबच्या मालकीची असेल.
एससी ईस्ट बंगालच्या नव्या लोगोचे अनावरण करताना, बांगर म्हणाले, “ईस्ट बंगाल सोबतच्या या नव्या भागीदारीबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. क्लबच्या नव्या लोगोमध्ये आधुनिकता आणली असली तरी, ईस्ट बंगालच्या पारंपारिक लोगोचे महत्व आम्ही जपले आहे. नव्या खेळाडू व प्रशिक्षकांसोबत ईस्ट बंगालचा वारसा पुढे नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
https://twitter.com/sc_eastbengal/status/1317304199785361410
एससी ईस्ट बंगालने आयएसएलच्या सातव्या हंगामापूर्वी लिव्हरपूलचे माजी दिग्गज रॉबी फावलर यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवीले आहे. फावलर यांच्यासह, संघाचे इतर सहायोगी प्रशिक्षक गोवा येथे पोहोचले असून, सध्या ते विलगीकरण कक्षात आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, आयएसएल सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाचा ‘स्टार स्ट्रायकर’ मुंबई सिटी एफसीकडे ; प्रशिक्षक लोबेरो यांनी केली घोषणा
शेफील्ड युनायटेडच्या मालकाने खरेदी केला भारतीय फुटबॉल क्लब; ‘हे’ आहे क्लबचे नवीन नाव






