जगभरात गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसत आहे. नुकतीच धक्कादायक गोष्ट समोर येत आहे, ती म्हणजे इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये तीन खेळाडू व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ८ जुलैपासून पाकिस्तान संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संपूर्ण संघ बदलण्यात आला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या नव्या संघाचे नेतृत्व पुनरागमन करत असलेले अष्टपैलू बेन स्टोक्सच्या हाती देण्यात आले आहे.
इंग्लंड संघाला बसला कोरोनाचा तडाखा
श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ ८ जुलैपासून पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेविरुद्धचाच संघ उतरवण्यात येणार होता. मात्र, मंगळवारी (६ जुलै) अचानकपणे इंग्लंड संघातील ७ सदस्य कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली. त्यामुळे, इंग्लंडच्या संपूर्ण संघाला आयसोलेशनमध्ये जावं लागल्याने ईसीबीला नवा संघ जाहीर करावा लागला.
मुख्य प्रशिक्षकांचे देखील आगमन
ईसीबीने जाहीर केलेल्या नव्या संघाला मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड मार्गदर्शन करतील. त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवेळी विश्रांती घेतलेली. भारत दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू बेन स्टोक्स या मालिकेतून कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. तो प्रथमच वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसेल. बेन डकेट, जेम्स विन्स व डेव्हिड मलान यांनी वनडे संघात पुनरागमन केले. वनडे संघात ९ खेळाडू प्रथमच निवडले गेले आहेत.
असा असेल इंग्लंडचा संघ-
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बॉल, डॅनी ब्रिग्ज, ब्रायडेन कार्स, झॅक क्राऊली, बेन डकेट, लुईस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, साकीब मेहमूद, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हरटन, मॅट पार्कीसन, डेव्हिड पेन, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन व जेम्स विन्स.
महत्त्वाच्या बातम्या –
यजमान इंग्लंड की पाहुणा भारत, कोण मारणार कसोटी मालिकेत बाजी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर
धक्कादायक! इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, एका रात्रीत बदलावा लागणार संपूर्ण संघ





