भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना एजबेस्टन मैदानावर खेळला जाणार आहे. पाहिल्या सामन्यात भारताला पराभवाला पत्करावा लागला होता त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 1-0 ने मागे आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करायचे असेल, तर त्यांना दुसरा सामना जिंकावा लागेल.
या सामन्यात सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालकडे (Yashsvi jaiswal) ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी असणार आहे. जर त्याचा फॉर्म कायम राहिला आणि त्याने या सामन्यात चांगली खेळी केली, तर डॉन ब्रॅडमॅनचा (Don bradman) विक्रम मोडून तो मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी फक्त ब्रॅडमॅननेच केली होती.
जयस्वालने त्याच्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्धच सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याची कामगिरी इंग्लंडविरुद्ध खूप चांगला राहिली आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 6 सामन्यांतील 11 डावांत 817 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 81.70 इतकी राहिलेली आहे आणि त्याने 3 शतके ठोकली आहेत. या सामन्यात जर यशस्वी जयस्वाल 183 धावा करू शकला, तर इंग्लंडविरुद्ध त्याच्या 1000 धावा पूर्ण होतील. आतापर्यंत डॉन ब्रॅडमॅननेच इंग्लंडविरुद्ध 13 डावांत 1000 धावा केल्या आहेत.
साल 2024 मध्ये यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) भारतीय कसोटी (Indian Test Cricket) क्रिकेटमधला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 15 सामन्यांतील 29 डावांत 54.74 च्या सरासरीने 1478 धावा केल्या आहेत. यात 3 शतके आणि 9 अर्धशतके समाविष्ट आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन चक्राची सुरुवातही त्याने जबरदस्त केली आणि इंग्लंडच्या मैदानावर पहिल्याच डावात शतक ठोकले. मात्र दुसऱ्या डावात तो फार काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला.
एजबेस्टनवर जर भारत हा सामना जिंकला, तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी होईल. टीम इंडियाने शेवटचा इंग्लंडविरुद्ध सामना 2007 मध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. जर गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरली तर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या भविष्यासाठी हे महत्वाचे पाऊल असेल.






