मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्ड , भारतीय क्रिकेट बोर्डास भारत- पाकिस्तान क्रिकेट सामने आयोजित करण्याची विनंती करत असतो. मात्र भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका भरवण्यास भारतीय क्रिकेट बोर्ड उत्सुकता दाखवत नाही. कारण पाकिस्तान भारत देशाच्या सीमेवर सतत छुपी आक्रमणे करत असतो.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या कंगालीच्या वाटेवर आहे. त्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ते भारत पाकिस्तान मालिका भरवू इच्छितात. पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी देखील भारत पाकिस्तान सामने व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांच्या मते, लोकांना भारत पाकिस्तान क्रिकेट मालिका बघायला आवडते. पण काही राजकीय नेत्यांना ही मालिका नको वाटते.
एहसान मणी क्रिकेट लेखक पीटर ओबोर्न आणि रिचार्ड हेलर यांच्यासोबत पॅडकास्टवर बोलताना म्हणाले, “आम्ही घेतलेला निर्णय बीसीसीआयला कळविला आहे. आम्ही भारतासोबत क्रिकेट मालिका खेळण्यासाठी तयार आहोत, पण यासाठी आम्ही भारताच्या पाठीमागे लागणार नाही. हा त्यांचा निर्णय आहे. ते जेव्हा क्रिकेट मालिका खेळण्यासाठी तयार होतील, आम्ही त्याला नकार देणार नाही .”
“भारत पाकिस्तान क्रिकेट सामना जेव्हा होतो तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष लागले जाते. या दोन्ही देशात होणारे सामने सर्वाधिक पाहिले जातात. मला कुणी तरी सांगितले आयसीसीच्या स्पर्धेत भारत पाकिस्तान जेव्हा खेळतात तेव्हा 200 ते 250 मिलियन लोक त्याला पाहतात. लोकांना वाटते की या दोन्ही देशात क्रिकेट मालिका व्हावी पण दोन्ही देशातील नेत्यांना नको वाटते,” असे एहसान मणी यांनी सांगितले.
भारत पाकिस्तान यांच्यात 2012-13 या वर्षांनंतर कोणतीही द्विपक्षीय मालिका झाली नाही. पाकिस्तानचा संघ वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. 2007-08 दोन्ही संघात शेवटची कसोटी मालिका झाली होती. 2021-13 सालानंतर दोन्ही संघ विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषकामध्ये एकमेकांविरुद्ध भिडले. दोन्ही संघात इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात शेवटचा सामना झाला होता.