भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट मालिका संपल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत पार पडणाऱ्या या लीगच्या तयारीसाठी भारतीय आणि परदेशी खेळाडू जमायला सुरु झाले आहेत. कोरोनाच्या सावटाखाली सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल विनाप्रेक्षक खेळवले जाणार आहे. परंतु आयपीएलचा महासंग्राम सुरू होण्यापुर्वीच कोरोनाने पाय पसरायला सुरू केले आहेत.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील एक-दोन नव्हे तब्बल आठ सदस्य कोरोनाच्या कचाट्यात सापडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत आयपीएलचे १० सामने
माध्यमांतील वृत्तांनुसार, वानखेडे स्टेडियमचे आठ ग्राउंडमन (मैदानाची देखरेख करणारे कर्मचारी) कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे. कारण या स्टेडियमवर आयपीएल २०२१ चे एकूण १० सामने आयोजित करण्यात आले आहेत.
१९ ग्राउंड स्टाफ सदस्यांची झाली होती कोरोना चाचणी
‘द हिंदू’मधील वृत्तानुसार, मागच्या आठवड्यात वानखेडे स्टेडियमच्या १९ ग्राउंड स्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. यातील ३ लोकांचा अहवाल २६ मार्च रोजीच आला होता, ज्यामध्ये ते तिनही व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी इतर ५ लोकांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
असे असले तरीही, सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ग्राउंड्समनला इतर सदस्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे का नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-