इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महासंग्रामानंतर देशांतर्गत क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत आहेत. त्यातील मानांकित रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या बाद फेरीचे सामने ६ जूनपासून सुरू होणार असून बेंगलोर येथे खेळले जाणार आहेत. याचे साखळी सामने फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळले गेले आहेत. बाद फेरीमध्ये मुंबई, बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड या संघांचा समावेश आहे. उत्तराखंड मागील तीन वर्षात दुसऱ्यांदा तर झारखंड २०१६-१७नंतर प्रथमच बाद फेरीत पोहोचले आहेत.
या संघांनी आतापर्यंत या हंगामात केलेल्या कामगिरी पाहूया,
मुंबई- मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या स्टाईलने रणजी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. यामध्ये पोहोचण्यासाठी त्यांना सौराष्ट्रच्या विजयावर अवलंबून राहावे लागले होते. शेवटच्या ग्रूप सामन्यात गोवा विरुद्ध त्यांचा पहिला डाव १६३ धावांवरच संपला होता. तर हा सामना त्यांनी ११९ या मोठ्या धावसंख्येने जिंकला होता. या हंगामात त्यांच्याकडून अष्टपैलू खेळाडू शम्स मुलानी याने चांगले प्रदर्शन केले आहे. या फिरकीपटूने गोवा विरुद्ध ११ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने या स्पर्धेत तीन सामने खेळताना २९ विकेट्स घेतल्या आहेत.
बंगाल- बंगालने तिन्ही साखळी सामन्यात विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचा सामना झारखंड विरुद्ध होणार आहे. मागील एक आठवड्यापासून बंगालचा संघ बेंगलोरमध्ये आहे. यादरम्यान त्यांनी कर्नाटक एकादश विरुद्ध दोन सराव सामनेही खेळले आहेत. तसेच बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरण दोन वर्षे भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये होता. तर शहबाझ अहमद याने स्थानिक क्रिकेट बरोबरीच आयपीएलमध्येही आपली उपस्थिती नोंदवली आहे. वृद्धीमान साहा संघात नसल्याने यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल याला संधी मिळाली आहे. तो यावर्षी जिंकलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक संघाचा भाग होता.
कर्नाटक- मयंक अग्रवालने संघात पुनरागमन केले असून त्याच्याव्यतिरिक्त करून नायर, देवदत्त पद्दीकल, मनिष पांडे हे देखील संघात असल्याने कर्नाटकची फलंदाज भक्कम असल्याचे दिसून येत आहे. मात्र विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन यांनी निवृत्ती घेतल्यापासून संघाची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. तर रोनित मोरे हा सगळ्यात अनुभवी गोलंदाज असून त्याने ३१ प्रथम श्रेणी सामन्यात ९७ विकेट्स घेतल्या आहेत.
मध्य प्रदेश- या संघातील अनेक खेळाडू भारतीय आणि आयपीएलच्या संघात खेळत आहे. त्यातील वेंकटेश अय्यर आणि आवेश खान यांनी भारतीय संघात जागा निर्माण केली आहे. तर रजत पाटीदार आणि कुमार कार्तिकेय यांनी पंधराव्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. तसेच मुंबईचे माजी प्रशिक्षक आणि विदर्भ संघाला २०१७ आणि २०१९ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकून देणारे चंद्रकांत पंडीत यांनी मध्ये प्रदेशासाठी चांगले काम केले आहे.
या संघाचा सलामीवीर यश दुबे याने केरळ विरूद्धच्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च २८९ धावा केल्या होत्या. त्याने पाटीदारसोबत २७७ धावांची भागीदारी केल्याने त्यांनी ५८५ धावांचा डोंगर उभारला होता. त्यात पाटीदारने १४२ धावा केल्या होत्या.
पंजाब- या संघाचे मगदिप सिंह आणि अनमोल मल्होत्रा यांनी हरयाणा विरुद्ध शतकी खेळी करत ४४४ धावसंख्या उभारली. नंतर त्यांच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. हा सामना पंजाबने १० विकेट्सने जिंकला. गोलंदाज अर्शदिप सिंहची कमी त्यांना जाणवणार आहे. त्याची दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेश आणि विदर्भ यांच्यात साखळी सामन्याच्या शेवटपर्यंत बाद फेरीसाठी चुरस सुरू होती. अखेर उत्तर प्रदेशने महाराष्ट्र विरुद्ध सामना जिंकत आपले स्थान पक्के केले. तर पावसामुळे विदर्भाची संधी वाया गेली. उत्तर प्रदेशकडून रिंकू सिंह याने सहा डावात ३०० धावा केल्या असून संघात प्रीयम गर्ग आणि अक्षदिप नाथ असल्याने त्यांची फलंदाज फळी चांगली आहे. तर यश दयाल आणि मोहसीन खान या गोलंदाजांनी आयपीएल २०२२मध्ये उत्तम कमागिरी केली आहे.
उत्तराखंड – बाद फेरीत उत्तराखंड मुंबई विरुद्ध खेळणार आहे. या हंगामात त्यांनी आंध्र प्रदेश विरुद्ध शेवटचा साखळी सामना गमावला असला तरी राजस्थान विरुद्धचा विजय त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी महत्वाचा ठरला आहे. रॉबिन बिस्ट आणि स्वप्निल सिंह यांचा अनुभव त्यांना चांगलाच उपयोगी पडेल.
झारखंड- दिल्ली विरुद्ध निसटता आणि तमिलनाडू विरुद्ध महत्वाच्या विजयाने ते २०१६-१७नंतर प्रथमच बाद फेरीत पोहोचले आहेत. सौरभ तिवारी आणि कुमार कुशाग्र हे झारखंडच्या फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत.
रणजी ट्रॉफी २०२१-२०२२ बाद फेरीच्या सामन्याचे वेळापत्रक-
६-१० जून २०२२, वेळ- सकाळी ९ वाजून ३० मिनिट
१. पहिला बाद फेरी सामना – बंगाल विरुद्ध झारखंड
२. दुसरा बाद फेरी सामना – मुंबई विरुद्ध उत्तराखंड
३. तिसरा बाद फेरी सामना – कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश
४. चौथा बाद फेरी सामना – पंजाब विरूद्ध मध्य प्रदेश
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, चाहत्याला ग्रेटभेट देत जिंकले हृदय
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला