नॉटींघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याचा शनिवारी (७ ऑगस्ट) चौथा दिवस होता. चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १४ षटकात १ बाद ५२ धावा केल्या आहेत. अजून भारताला १५७ धावांची गरज आहे. भारताकडून रोहित शर्मा १२ आणि चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद खेळत आहेत.
भारताकडून २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी आले होते. त्यांनी सुरुवातही चांगली केली. मात्र, केएल राहुल २६ धावांवर ११ व्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक जॉस बटलरकडे झेल देऊन बाद झाला. त्यामुळे दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी काही षटकेच उरली असताना चेतेश्वर पुजाराला मैदानात यावे लागले.
भारतासमोर इंग्लंडचे २०९ धावांचे आव्हान
या सामन्यात इंग्लंडकडून जो रुटने शतकी खेळीसह शानदार कामगिरी केली आहे. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ८५.५ षटकांत सर्वबाद ३०३ धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील ९५ धावांच्या पिछाडीमुळे भारतासमोर त्यांना २०९ धावांचे आव्हान उभे करता आले आहे.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने १०९ धावांची शतकी खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३० आणि सॅम करनने ३२ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही करता आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.
बुमराहच्या ५ विकेट्स
तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु होताच काही वेळात जोस बटलरला ७१ व्या षटकात शार्दुल ठाकूरने त्रिफळाचीत करत माघारी धाडले. त्याने १७ धावा केल्या. पण असे असले तरी इंग्लंडचा कर्णधार जो रुटने एक बाजू भक्कमपणे सांभाळताना शतकी खेळी केली आहे. त्याने १५४ चेंडूत त्याने कारकिर्दीतील २१ वे कसोटी शतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने २०२१ वर्षात कसोटीमध्ये १००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत.
पण, रुट शतकी खेळी केल्यानंतर फार काळ टिकू शकला नाही. त्याला ८१ व्या षटकात जसप्रीत बुमराहने बाद केले. रुटचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला. रुटने १७२ चेंडूत १४ चौकारांसह १०९ धावा केल्या. रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडची खालची फळी झटपट बाद झाली. सॅम करनला ३२ धावांवर मोहम्मद सिराजकरवी बुमराहने झेलबाद केले. तर स्टुअर्ट ब्रॉड शुन्यावर बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यासह बुमराहने दुसऱ्या डावात ५ विकेट्स पूर्ण केल्या. अखेरीस ऑली रॉबिन्सनला १५ धावांवर मोहम्मद शमीने बाद करत इंग्लंडचा डाव ८६ व्या षटकात ३०३ धावांवर संपवला.
दुसऱ्या सत्राखेरपर्यंत इंग्लंड २०० धावा पार
दुसऱ्या सत्रातही जो रुट आणि सिब्लीने सावध सुरुवात केली होती. मात्र, बुमराहने ४६ व्या षटकात सिब्लीला २८ धावांवर यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांची ८९ धावांची भागीदारी तुटली. पण त्याच्यानंतरही जॉनी बेअरस्टोने रुटला भक्कम साथ दिली. त्यांनी ४२ धावांची भागीदारी केली. पण मोहम्मद सिराजने ५८ व्या षटकात बेअरस्टोला ३० धावांवर झेलबाद करत मोठा अडधळा दूर केला. त्याचा झेल रविंद्र जडेजाने घेतला.
यानंतर डॅनिएल लॉरेन्सला शार्दुल ठाकूरने फार काळ टिकू न देता ६५ व्या षटकात २५ धावांवर पायचीत केले. त्यामुळे इंग्लंडला ५ वा धक्का बसला. असे असले तरी एक बाजू जो रुटने सांभाळली होती. त्याला लॉरेन्स बाद झाल्यानंतर जोस बटलरने साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या सत्राखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही.
त्यामुळे दुसऱ्या सत्राखेरपर्यंत दुसऱ्या डावात इंग्लंडने ७० षटकांत ५ बाद २३५ धावा केल्या. त्यांच्याकडून जो रुट ९६ धावांवर आणि बटलर १५ धावांवर नाबाद खेळत आहे. इंग्लंडने १४० धावांची आघाडी घेतली आहे.
रुट, सिब्लीने सावरला इंग्लंडचा डाव
चौथ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावातील ११.२ षटके आणि बिनबाद २५ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. इंग्लंडकडून सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्ली हे चौथ्या दिवशी फलंदाजीसाठी उतरले होते. मात्र, बर्न्स फार काळ तग धरु शकला नाही. त्याला १६ व्या षटकात मोहम्मद सिराजने यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे बर्न्स १८ धावांवर माघारी परतला. त्याच्यानंतर १७ व्या षटकात जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला ६ धावांवर बाद केले. क्रॉलीचा झेलही पंतनेच घेतला.
पण यानंतर जो रुटने सिब्लीला साथीला घेत इंग्लडचा डाव सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनी संयमी फलंदाजी करताना धावफलक हलता ठेवला. या दोघांनी पहिले सत्र संपेपर्यंत भारताला यश मिळू दिले नाही. दोघांनी पहिले सत्र संपेपर्यंत नाबाद ७३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. तसेच रुटने या सामन्यातील दुसरे अर्धशतकही पूर्ण केले.
पहिले सत्र संपले तेव्हा दुसऱ्या डावात इंग्लंडने ४० षटकांत २ बाद ११९ धावा केल्या असून अजून ते २४ धावांनी पिछाडीवर आहेत. रुट ५६ धावांवर आणि सिब्ली २७ धावांवर नाबाद खेळत आहेत.