इंग्लंड विरुद्ध भारत, ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आले आहेत. मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकला आहे. सामना जिंकल्याच्या आनंदात इंग्लंडच्या जोस बटलर आणि हसीब हमीद या दोन खेळाडूंनी वेगळ्याच प्रकारे आनंद व्यक्त केला आहे. या दोघांनी मैदानावर गोल्फ खेळून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.
सामन्यात इंग्लंडने भारताला त्यांच्या दुसऱ्या डावात २७८ धावांवर सर्वबाद करत सामना खिशात घातला. मलिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला होता आणि दुसऱ्या लाॅर्ड्सवरील सामन्यात भारताने इंग्लंडवर १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
इंग्लंड क्रिकेट संघ हेडिंग्ले मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यामुळे जोरदार आनंद व्यक्त करत आहे. इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक पाॅल कोलिंगवुड याने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून खेळाडूंचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओत बटलर आणि हमीद हे दोघेही गोल्फ खेळताना दिसत आहेत. बटलर आणि आमीद यांना गोल्फचा चेंडू एका शाॅटमध्ये बादलीत पाठवायचा होता आणि दोघांनीही हे आव्हान पूर्ण केले आहे.
भारताविरुद्धचा कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यातून माघार घेऊ शकतो बटलर
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बटलर भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यातून माघार घेऊ शकतो. त्याने याआधीच आयपीएलच्या यूएईत खेळवल्या जाणाऱ्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतलेली आहे. मिळालेल्या माहितीवरून असे सामजते की, बटलरची पत्नी लूसी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. या पार्श्वभूमीवर बटलर मालिकेतील अंतिम सामन्यातून माघार घेऊ शकतो असा अंदाज आहे. बटलरविषयी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सांगितले, “बटलरच्या उपस्थितीबाबत काही दिवसात कळेल”
भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात मिळालेल्या दारुण पराभवामुळे मालिकेतील भारताची आघाडी आता बरोबरीत बदलली आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत.
तसेच, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवर या तिसऱ्या सामन्यातील पराभवामुळे मोठा बदल झाला आहे. यापूर्वी भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. तो आता खाली घसरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. इंग्लंडचा संघ सामन्यातील विजयानंतरही चौथ्या स्थानावरच कायम आहे. पाकिस्तान आणि वेस्टइंडीज हे दोन संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘त्रिमूर्ती’लाही पुरुन उरला एकटा जो रूट, कामगिरी पाहून तुम्हीही कराल कौतुक
तीन कसोटी सामने संपले, तरीही पंतला गवसेना सूर; कर्णधार कोहली म्हणाला…
‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल