भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याच्यावर सर्व बाजूंनी टीका केली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात गुरुवारी (१४ जुलै) विराट पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. विराटने या सामन्यात अवघ्या १६ धावांवर विकेट गमावली आणि भारतीय संघाला हा सामना १०० धावांच्या अंतराने गमवावा लागला. सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलरने मात्र विराटची पाठराखण केली.
जोस बटलर (Jos Buttler) याला आश्चर्य वाटत आहे की, विराट कोहली (Virat Kohli) वर अशा प्रकारे टीका होत आहेत. तो म्हणाला की, “आपल्यापैकी अनेकांनी हा विचार केला पाहिजे की, तो देखील माणूस आहे आणि तो कमी धावसंख्येवर बाद होऊ शकतो. तो जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. तो अनेक वर्षांपासून चांगले प्रदर्शन करत आला आहे. खेळाडूंसोबत कधी-कधी असे होते.”
“विरोधी संघाच्या कर्णधाराच्या रूपात तुम्हाला नक्कीच माहिती आहे की, तो कोणत्या क्लासचा खेळाडू आहे. त्यामुळे अपेक्षा असते की, त्याने तुमच्याविरोधात धावा करू नये. अविश्वसनीय आहे की, विराट कोहलीची आकडेवारी स्वतः बोलते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकवून दिले आहेत, त्यावर तुम्ही कसे प्रश्न उपस्थित करू शकता,” असेही बटलर पुढे बोलताना म्हणाला.
विराटच्या सध्याच्या फॉर्मचा विचार केला, तर त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला असा कठीण परिस्थितीचा सामना यापूर्वी कधीच करावा लागला नव्हता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक केले आहेत. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटचे शतक ठोकले होते. त्यानंतर तब्बल अडीच वर्ष झाले, पण त्याचे पुढचे शतक पाहण्यासाठी चाहते अजूनही आतुर आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतीच्या कारणास्तव विराटने सहभाग घेतला नव्हता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट खेळला, पण त्याला अपेक्षित धावा करता आल्या नाहीत. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाईल. इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे, पण विराटला या दौऱ्यात विश्रांती दिली गेली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत विश्रांतीवर असेल.