गतविजेत्या इंग्लंड संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत खूपच खराब प्रदर्शन केले. मात्र, शेवट गोड करण्यास ते विसरले नाहीत. कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर स्पर्धेचा 44वा सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 93 धावांनी विजय मिळवला. जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंडने स्पर्धेत 9 सामने खेळत फक्त 3 विजय काबीज केले, तर 6 सामन्यात पराभवाचा सामना केला. असे असले, तरीही पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर बटलरने खेळाडूंचे कौतुक केले.
बटलरचे विधान
पाकिस्तान संघाला 93 धावांनी पराभवाचा धक्का दिल्यानंतर कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) म्हणाला, “चांगले प्रदर्शन करणे आणि अशाप्रकारे शेवट करणे चांगले आहे. अखेर ही एक निराशाजनक स्पर्धा राहिली. आम्ही बेन स्टोक्सशिवाय सामना करण्यासाठी सक्षम असले पाहिजे होते. आम्हाला माहितीये की, बेन किती शानदार खेळाडू आहे. मागील 2 सामन्यात त्याने शानदार प्रदर्शन केले. काही सामन्यांसाठी त्याचे संघात नसणे निश्चितच एक आव्हान होते. मात्र, आम्ही त्याचा सामना करण्यात सक्षम होतो. आम्ही खेळापूर्वी याबाबत चर्चा केली.”
इंग्लंडचा दणदणीत विजय
सामन्याचा आढावा घ्यायचा झाला, तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 337 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टोने 59 धावा केल्या. तसेच, जो रूट याने 60 धावांची खेळी केली, तर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सर्वाधिक 84 धावा केल्या. इंग्लंडच्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा कोणताही मुख्य फलंदाज खास प्रदर्शन करू शकला नाही. बाबर आझम (Babar Azam) याने 38 धावांची खेळी केली. तसेच, मोहम्मद रिझवान 36 धावा करून बाद झाला, तर सौद शकीलने 29 धावा केल्या.
बटलरसाठी विश्वचषक 2023 फ्लॉप
विश्वचषक 2023 स्पर्धेत बटलर फ्लॉप ठरला. त्याची 43ही स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. ही खेळी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केली होती. यानंतर त्याने सर्व सामन्यात निराश केले. या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने फक्त 27 धावांचे योगदान दिले. मात्र, या खेळीत त्याने 1 षटकार आणि 3 चौकार मारले. त्यानंतर हॅरिस रौफ याने त्याला धावबाद केले. बटलरने स्पर्धेत 9 सामने खेळताना फक्त 138 धावा केल्या. (eng vs pak captain jos buttler gave an emotional statement after world cup 2023 exit)
हेही वाचा-
वेलडन विली! अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात बनला सामनावीर, शानदार राहिली कारकीर्द
पाकिस्तानच्या पदरी शेवटीही हारच! धमाकेदार विजयासह इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय