यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 मधील दुसऱ्या सामन्यात जाॅस बटलरच्या इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात इंग्लडने वेस्ट इंडिजवर 8 विकेट्स आणि 15 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. विस्फोटक सलामीवीर फिलिप साॅल्टने 47 चेंडूत नाबाद 87 धावा करुन इंग्लडला मोलाचे योगदान दिले. साखळी फेरीत चारही सामने जिंकलेल्या वेस्ट इंडिजला इंग्लंडने लाल दिवा दाखवला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी यशस्वी ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत 4 गडी गमावून 180 धावा केल्या. संघासाठी जॉन्सन चार्ल्सने 34 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 38 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने अवघ्या 17.3 षटकांमध्ये विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सामन्यावर सुरुवातीपासूनच मजबूत पकड होती त्यामुळे गतविजेत्या संघाने एकतर्फी विजय मिळवला.
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी फिलिप सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनी इंग्लंडला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची (46 चेंडू) भागीदारी केली. ही मजबूत भागीदारी 8व्या षटकात संपुष्टात आली. रोस्टन चेसने बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बटलरने 22 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. त्यानंतर 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोईन अलीच्या रुपाने संघाला दुसरा धक्का बसला, जो आंद्रे रसेलने बाद दिला. मोईनने 10 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा केल्या.
यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना इंग्लंडची एकही विकेट काढण्यात यश मिळाले नाही. येथून, फिलिप सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टोने 97* धावांची मॅच विंनिग भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या पलीकडे नेले. सॉल्टने 47 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 87* धावा केल्या. याशिवाय बेअरस्टोने 26 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48* धावा केल्या.
महत्तवाच्या बातम्या-
भारताची एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी, स्मृती मानधाना, हरमनप्रीत कौरचे झंझावाती शतक
स्मृती मानधनानं रचला इतिहास! 84 सामन्यांतच 7 शतके झळकावून केली मिताली राजची बरोबरी
क्विंटन डी कॉकचं झंझावाती अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेसमोर ठेवलं 195 धावांचं आव्हान