वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (WI vs ENG) यांच्यात बार्बाडोसच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी शतके केली आहेत. त्यांच्या या मोठ्या खेळींच्या जोरावर इंग्लंडने ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. शतकी खेळीसह रूट आणि स्टोक्सने विक्रमांचे मनोरे रचले आहेत. दरम्यान अष्टपैलू म्हणून स्टोक्सच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे.
स्टोक्सने शतक ठोकत त्याच्या कसोटीतील ५००० धावा (Ben Stokes 5000 Test Runs) पूर्ण केल्या आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजार धावा आणि १५० पेक्षा जास्त विकेट्स (5000 Runs & 150 Wickets In Test) घेणारा पाचवा अष्टपैलू बनला आहे.
या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडकडून कर्णधार रूटने अतिशय संथपणे १५३ धावांची खेळी केली. मात्र त्याची विकेट गेल्यानंतर वेस्ट इंडिजने सामन्यात पुनरागमन केले. इंग्लंडची गाडी रुळावरून घसरत असतानाच स्टोक्सने आक्रमक पवित्रा घेतला आणि १२८ चेंडूंमध्ये ६ षटकार व ११ चौकारांच्या मदतीने १२० धावा केल्या. या खेळीसह त्याने कसोटीतील ५००० धावांचा पल्ला गाठला आहे. सध्या त्याच्या खात्यात ५०३६ धावांची नोंद आहे.
तसेच त्याने आतापर्यंत कसोटीत १७० विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा आणि १५० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या अष्टपैलूंच्या यादीत सहभागी झाला आहे. त्याने त्याच्या ७८ व्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे. त्याच्यापूर्वी गॅरी सोबर्स, इयान बॉथम, भारताचे कपिल देव आणि जॅक्स कॅलिस हे दिग्गज या यादीत आहे.
- कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा आणि १५० पेक्षा जास्त विकेट्स घेणारे अष्टपैलू-
गॅरी सोबर्स- ८०३२ धावा आणि २३५ विकेट्स, ९३ कसोटी
इयान बॉथम – ५२०० धावा आणि ३८३ विकेट्स, १०२ कसोटी
कपिल देव – ५२४८ धावा आणि ४३४ विकेट्स, १३१ कसोटी
जॅक कॅलिस – १३२८९ धावा आणि २९२ विकेट्स, १६६ कसोटी
बेन स्टोक्स- ५०३६ धावा आणि १७० विकेट्स, ७८ कसोटी
स्टोक्सचा अजून एक विक्रम
याबरोबरच पदार्पण केल्यापासून कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टोक्स अव्वलस्थानी आहे. त्याने याबाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही (Rohit Sharma) मागे टाकले आहे. स्टोक्सने आतापर्यंत ८७ षटकार ठोकले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा असून त्याने ६० षटकार ठोकले आहेत. तसेच, ५५ षटकारांसह श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज तिसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा असून त्याने ५४ षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकच्या वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ
कारकिर्दीत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात एकतरी झेल घेणारा भारतीय दिग्गज