आयसीसी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. जर पावसामुळे सामना रद्द झाला नाही, तर या संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. त्याचवेळी या दोन्ही संघांनी अंतिम फेरीपर्यंत प्रवास कसा केला आहे याबाबत आपण जाणून घेऊया.
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून विश्वचषकात सहभागी झालेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून तसाच खेळ दाखवला. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांनी आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात इंग्लंडने सॅम करनच्या पाच बळींच्या जोरावर अफगाणिस्तानला 112 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर फलंदाजांनी संयमाने फलंदाजी करत हे लक्ष 5 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का बसला. पावसाच्या व्यत्ययाने डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांना दुबळ्या आयर्लंडविरुद्ध पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा पाऊस आल्याने दोन्ही संघांना एकेका गुणावर समाधान मानावे लागले.
चौथ्या सामन्यात त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या न्यूझीलंडला 20 धावांनी पराभूत केले. तर, उपांत्य फेरीसाठी विजय आवश्यक असताना श्रीलंकेला 4 गडी राखून पराभूत करत त्यांनी उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. त्यानंतर उपांत्य सामन्यात भारतीय संघावर 10 गड्यांनी विजय मिळवून त्यांनी अंतिम फेरीत जागा पटकावली.
दुसरीकडे, पाकिस्तानने सर्वांच्या अपेक्षांच्या विरुद्ध जात अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. त्यांना सलामीच्या सामन्यात भारताविरुद्ध अखेरच्या चेंडूवर पराभूत व्हावे लागले. त्यानंतर पात्रता फेरीतून पुढे आलेल्या झिम्बाब्वेने त्यांच्यावर केवळ एका धावेने विजय मिळवून खळबळ उडविली. त्यानंतर पाकिस्तानने खडबडून जागे होत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. त्यानंतर नेदरलँडवर त्यांनी मोठा विजय मिळवला.
या दोन्ही विजयानंतर त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित नव्हता. मात्र, साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी नेदरलँड्सने विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर करत दक्षिण आफ्रिकेला मात दिली. त्यानंतर उपांत्य फेरीसारख्या झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडसारख्या गटात अव्वलस्थानी राहिलेल्या संघाला त्यांनी नमवत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना अंतिम सामन्यात विजय मिळवून दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक उंचावण्याची संधी असणार आहे.
(England And Pakistan Road To Final 2022 T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधता तुम्ही…’, भारताच्या इरफानने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डागली तोफ, पण का?
आख्ख्या जगाने केले टीम इंडियाला ट्रोल, पण न्यूझीलंडच्या दिग्गजाकडून मिळाला सल्ला; म्हणाला, ‘धाडसी…’