क्रिकेट खेळाडूंचं निवृत्तीचं सरासरी वय 35 वर्षाच्या आसपास आहे. मात्र तुम्हाला जाणून धक्का बसेल की, इंग्लंडच्या एका क्रिकेटपटूनं वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षीच व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
बेन वेल्स असं ग्लुसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या या क्रिकेटपटूचं नाव आहे. त्याला हृदयविकाराचा गंभीर आजार झाल्याचं निदान झाल्यानंतर वयाच्या 23व्या वर्षी क्रिकेटला अलविदा म्हणावं लागलं. चाचणी दरम्यान वेल्सला एरिथमोजेनिक राईट व्हेंट्रिक्युलर कार्डिओमायोपॅथी (एआरव्हीसी) असल्याचं निदान झालं, ज्यामुळे तो यापुढे जड वर्कआउट करू शकत नाही. या आजाराचं निदान झाल्यानंतर वेल्सनं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.
ग्लुसेस्टरशायर काउंटी क्लबनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून वेल्सच्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. क्लबनं पोस्टमध्ये लिहिलं की, “बेन वेल्सच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनं ग्लुसेस्टरशायर क्लबला खूप दुःख झालं आहे. बेनला नियमित तपासणीनंतर हृदयविकाराचं निदान झालं. यामुळे तो पुढे खेळणं सुरू ठेवू शकत नाही. क्लबमधील प्रत्येकजण बेनसाठी खूप दुःखी आहे. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देतो.”
ग्लुसेस्टरशायर क्लबनं जाहीर केलेल्या एका निवेदनात बेन म्हणाला, “दुर्दैवानं मी व्यावसायिक क्रिकेटमधून त्वरित निवृत्ती घेतली पाहिजे. येत्या आठवड्यात मला डिफिब्रिलेटर रोपण करणं आवश्यक आहे. हे खूप कठीण आहे. या तपासणीनं माझं जीवन बदललं. आशा आहे की कालांतरानं मी यातून बाहेर येऊ शकेन.”
बेन पुढे म्हणाला, “हा चढ-उतारांचा प्रवास आहे. वयाच्या 18 व्या वर्षी कॉन्ट्र्रॅक्ट न मिळण्यापासून ते वयाच्या 21 व्या वर्षी ग्लुसेस्टरशायरमध्ये संधी मिळण्यापर्यंत, अनेक मोठ्या दुखापतींना सामोरे जात मी एकमेव व्यावसायिक शतकासह माझी कारकीर्द पूर्ण केली.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘किंग्ज’च्या लढतीत पंजाबची बाजी, घरच्या मैदानावर चेन्नईचा दारुण पराभव