भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचे खेळाडू काही दिवसांपूर्वीच चेन्नईत दाखल झाले होते. यातील काही खेळाडू इंग्लंडमधून तर उर्वरित संघ श्रीलंकेतून भारतात दाखल झाले. यातील इंग्लंडमधून आलेल्या खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी काल समाप्त झाला. त्यामुळे या खेळाडूंनी आजपासून सरावाला सुरुवात केली.
या खेळाडूंमध्ये अष्टपैलू बेन स्टोक्स, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि सलामी फलंदाज रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे. सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर या खेळाडूंनी शनिवारी चेपॉकच्या मैदानावरील सराव सत्रात सहभाग नोंदवला.
त्याचवेळी इंग्लंडच्या बाकी खेळाडूंची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आल्याने मालिकेत खेळण्याचा त्यांचा मार्गही मोकळा झाला आहे. मात्र त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला नसल्याने त्यांना सरावाला २ फेब्रुवारीपासून सुरुवात करता येईल. दरम्यान, स्टोक्स आणि आर्चर श्रीलंका दौऱ्याचा भाग नसल्याने ते उर्वरित खेळाडूंच्या आधी भारतात दाखल झाले होते. रोटेशन पॉलिसीच्या अंतर्गत त्यांना आराम देण्यात आला होता. याशिवाय बर्न्स आपल्या अपत्याच्या जन्मामुळे या दौऱ्यात संघाचा भाग नव्हता.
इंग्लंडच्या मिडिया व्यवस्थापकांनी याबाबत माहिती देताना सांगितले, “खेळाडूंपैकी जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि रॉरी बर्न्सने आज सरावाला सुरुवात केली. पुढील तीन दिवस ते दररोज दोन तास सराव करतील. तसेच उर्वरित खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने ते देखील २ फेब्रुवारीपासून सरावात भाग घेतील.”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या या मालिकेत एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिले दोन सामने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नूतन मोटेरा मैदानावर खेळवले जातील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे.
महत्वाच्या बातम्या:
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचा अजिंक्य रहाणेला फायदा, कसोटी क्रमवारीत पटकावलं हे स्थान
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या या धाकड फलंदाजाचे होतेय पुनरागमन