सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. पहिल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, हेडिंग्ले ओव्हल येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर ४५ धावांनी दणदणीत मात करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करणारा अष्टपैलू मोईन अली सामन्याचा मानकरी ठरला.
इंग्लंडने ठोकले द्विशतक
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुखापतग्रस्त झालेला अनुभवी यष्टीरक्षक जोस बटलर यांनी या सामन्यातून पुनरागमन केले. इंग्लंडला प्रथम फलंदाजी करताना १८ धावांवर दोन धक्के मिळाले. मात्र, त्यानंतर बटलर आणि मोईन अली यांनी डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी त्यांनी ६३ धावांची भागीदारी रचली. अलीने १६ चेंडूत ३६ तर, बटलरने ३९ चेंडूत ५९ धावांची अप्रतिम अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या सामन्यातील शतकवीर लियाम लिव्हींगस्टोन याने ३८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २०० पर्यंत पोहोचवली. पाकिस्तानसाठी मोहम्मद हसनैन याने तीन तर, इमाद वसीम व हारीस रौफ यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
इंग्लिश गोलंदाजांची भेदक गोलंदाजी
इंग्लंडने ठेवलेले २०१ धावांचे मोठे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानला कर्णधार बाबर आझम(२२) व मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, त्यानंतर नियमित अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. रिझवानने सर्वाधिक ३७ तर, शादाब खानने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. निर्धारित २० षटकात पाकिस्तान ९ बाद १५५ धावा करू शकला. इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाज साकीब मेहमूदने तीन बळी आपल्या नावे केले.
फलंदाजीत ३६ धावा आणि गोलंदाजीत २ बळी मिळवणाऱ्या मोईन अलीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील निर्णायक सामना २० जुलै रोजी मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला. इंग्लंडने यापूर्वीच वनडे मालिका आपल्या नावे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कर्णधार’ धवन पहिल्या वनडेत चमकला! वाडेकर, तेंडुलकर सारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील
खेळाडू, कर्णधार म्हणूनच नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही पहिल्या वनडेत द्रविडच्या पारड्यात विजयच
टी२० पाठोपाठ वनडे पदार्पणातही इशान किशनचे अर्धशतक; ‘या’ विश्वविक्रमाच्या यादीत मिळवले स्थान






