विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ सध्या मिळालेल्या ३ आठवड्यांच्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा जोरदार सरावाला सुरुवात करणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मोठ्या मालिकेपूर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने मोठे वक्तव्य केले आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघाला १-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. रोटेशन पॉलिसीमुळे इंग्लंड संघातील मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. यामध्ये बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स आणि मोईन अली यांचा समावेश होता. आयपीएल स्पर्धा खेळून आल्यामुळे या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.
पण याचा परिणाम इंग्लंडच्या कामगिरीवर झाला. अनेक अनुभवी खेळाडू संघात नसल्याने हा एक मजबूत संघ नव्हता, असे मत अनेकांनी मांडले. याच कारणामुळे इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीवर टीकाही झाली. पण आता रुटने म्हटले आहे की ही रोटेशन पॉलिसी मागे टाकण्याची वेळ आली आहे.
जो रूटचे ॲशेस मालिका आणि भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेबाबत मोठे वक्तव्य
जो रूटने म्हटले की, “आम्ही आता अशा स्थितीत पोहोचलो आहोत, जिथे रोटेशन पॉलिसी आणि विश्रांती खूप मागे राहिली आहे. कोरोना विषाणूमुळे आणि खूप जास्त क्रिकेट खेळल्यामुळे,आम्हाला वेग-वेगळ्या प्रकारात आणि वेग-वेगळ्या संघासाठी बऱ्याच गोष्टींचे व्यवस्थापन करावे लागले आहे. दोन उत्कृष्ट संघाविरुद्ध आम्हाला १० कसोटी सामने खेळायचे आहेत. ही सर्व खेळाडूंसाठी एक उत्तम संधी आहे. जर सर्व खेळाडू फिट राहिले आणि चांगले क्रिकेट खेळले तर आमचा एक चांगला आणि मजबूत संघ असेल. येणाऱ्या ५ कसोटी सामन्यांमध्ये आम्ही आमचा सर्वात मजबूत संघ मैदानात उतरवण्याच्या प्रयत्नात असणार आहोत.”(England ready to do away rest away and rotation policy against India)
इंग्लंड विरुद्ध भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका –
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या-
रबाडाच्या अचूक यॉर्कर चेंडूने स्टंप्स चक्काचूर, फलंदाज पोलार्डही बघतच राहिला
भारत वि. पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात घडला होता गंभीर-आफ्रिदीत हाय व्होल्टेज ड्रामा; वाचा किस्सा
अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडविरुद्ध असणार रोहितचा सलामी जोडीदार!