नॉटिंघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंट ब्रिजवर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या अखेरच्या दिवशी (८ ऑगस्ट) पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आहे.
हा सामना चौथ्या दिवशी थांबला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात १४ षटकात १ बाद ५२ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती, तर इंग्लंडला ९ विकेट्सची गरज होती. मात्र, अखेरच्या दिवशी पावसाने सकाळपासूनच हजेरी लावल्याने सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता पुढील सामना १२ ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु होणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताने घेतली आघाडी
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत इंग्लंडला १८३ धावांवर रोखले. इंग्लंडकडून या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तसेच सॅम करनने नाबाद २७ आणि जॉनी बेअरस्टोने २९ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर शमीने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.
यानंतर भारताने पहिल्या डावात ८४.५ षटकात २७८ धावा केल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात ९५ धावांची आघाडी मिळवली. भारताकडून या डावात केएल राहुल ८४ धावांची आणि रविंद्र जडेजाने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ३६ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने २५ आणि जसप्रीत बुमराहने २८ धावा केल्या. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ४ विकेट घेतल्या.
दुसऱ्या डावात रुटची शतकी खेळी
इंग्लंडने दुसऱ्या डावात ८५.५ षटकांत सर्वबाद ३०३ धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील ९५ धावांच्या पिछाडीमुळे भारतासमोर त्यांना २०९ धावांचे आव्हान उभे करता आले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने १०९ धावांची शतकी खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ३० आणि सॅम करनने ३२ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही करता आले नाही.
भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.
यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला होता. त्यांनी दुसऱ्या डावात १ बाद ५२ धावा केल्या असतानाच चौथ्या दिवसाचा खेळ संपला आणि पाचव्या दिवशी खेळच झाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर चहलने पत्नी अन् सासूबाईसोबत लावले ठुमके; व्हिडिओ तुफान व्हायरल
नीरजनं ‘गोल्ड’, तर मिराबाईनं पटकावलं ‘सिल्व्हर’; पाहा कोणाला मिळालं कोणतं पदक?
गेल्या ३ वर्षात एकही ग्रँड जिंकले नसले, तरी कमाईच्या बाबतीत रॉजर फेडरर ठरतोय भल्याभल्यांना भारी






