टेनिस महान रॉजर फेडरर आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. २२ वर्षांपासून सातत्याने आपली प्रतिभा सिद्ध करत असलेला फेडरर २० वेळा ग्रँडस्लॅम विजेता आहे. फेडरर जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. तसेच जगभरात त्याला मोठी लोकप्रियता आहे. गेली २२ वर्षे तो टेनिस कोर्ट गाजवत आहे.
असे असले तरी, तो गेल्या तीन वर्षात संघर्ष करताना दिसत आहे, यासाठी दुखापती सर्वात मुख्य कारण आहे. त्यामुळे फेडररला गेल्या तीन वर्षात अनेक स्पर्धांनाही मुकावे लागले असून त्याला ग्रँडस्लॅम विजेतेपदही मिळवता आलेले नाही. असे असूनही कमाईच्या बाबतीत तो अजूनही राफेल नदाल आणि नोवाक जोकोविचपेक्षा खूप पुढे आहे.
या स्विस स्टारने या ३ वर्षात सुमारे २१५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाईच्या टॉप -१० खेळाडूंच्या यादीत तो २०२१ मध्ये सातव्या क्रमांकावर होता. टॉप -१० मध्ये फेडरर एकमेव टेनिस खेळाडू आहे.
फेडररने २० ग्रँडस्लॅम विजेतेपदं आपल्या नावे केली
टेनिस जगतातील जवळजवळ प्रत्येक विक्रम करणारा फेडरर ग्रास कोर्ट आणि हार्ड कोर्टचा मुकूट नसलेला राजा राहिला आहे. तो लाल मातीच्या कोर्टवर फारसा प्रभावी ठरला नसला तरी, त्यातही त्याला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वर्षानुवर्षे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकांवर राहिलेल्या फेडररने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ८ विम्बल्डन, ५ यूएस ओपन आणि १ फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.
सध्या पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूंमध्ये सध्या फेडरर, नदाल आणि जोकोविच प्रत्येकी २० विजेतेपदांसह अव्वल क्रमांकावर आहेत.
२२ वर्षांपर्यंत एटीपी टॉप १०० मध्ये स्थान मिळवले
११ ऑक्टोबर १९९९ रोजी रॉजर फेडररचा पहिल्यांदा एटीपी टॉप १०० टेनिस खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात झाला होता. त्यावेळी फेडरर फक्त १९ वर्षांचा होता. २२ वर्षांनंतरही फेडरर या यादीत कायम आहे. फेडरर सध्या ९ व्या स्थानावर आहे. तसेच फेडरर १०० एटीपी विजेतेपद जिंकणारा जगातील दुसरा टेनिसपटू आहे.
१९ देशांमध्ये विजेतेपद पटकावले
फेडररने १९ देशांमध्ये ३१ वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने या कालावधीत १२५१ सामने जिंकले आहेत. तर, २७५ सामने गमावले आहेत. फक्त जिमी कॉनर्स (१२७४) ने त्याच्यापेक्षा जास्त सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
नीरजने सुवर्ण पदक जिंकल्यावर भारतीय क्रिकेट संघाने केली ‘ही’ गोष्ट; ‘बुम बुम बुमराह’चे वक्तव्य
आपल्या बॅगेत मिराबाई चानू ठेवते ‘ही’ गोष्ट; तर परदेशातही खाते गावाकडील भात, जाणून घ्या रंजक गोष्टी