नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 329 धावा केल्या आहेत.
भारताकडून या डावात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली. या दोघांचीही शतके थोडक्यात हुकली.
विराटने या सामन्यात 152 चेंडूत 97 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार मारले. तर रहाणेने 131 चेंडूत 12 चौकारांसह 81 धावा केल्या. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 159 धावांची दिडशतकी भागिदारी रचली.
तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात पहिल्या दिवशी सलामीवीर फलंदाज केएल राहुल(23) आणि शिखर धवनने(35) चांगली केली होती. परंतू 60 धावांची भागिदारी रचल्यानंतर धवन बाद झाला. त्यानंतर काही वेळातच राहुलही बाद झाला.
तसेच चेतेश्वर पुजारानेही सर्वांची निराशा केली. तोही या सामन्यात लवकर बाद झाला. त्याला 14 धावाच करता आल्या.
भारताच्या पहिल्या तिनही विकेट अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने घेतल्या. परंतू नंतर विराट-रहाणेच्या जोडीने भारताचा डाव सावरल्याने पहिल्या दिवसाखेर भारताने 300 धावांचा टप्पा पार केला होता.
पहिल्या दिवशी शेवटच्या चेंडूवर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला(18) जेम्स अँडरसनने बाद केले. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 6 बाद 307 धावांपासून केली. पंरतू भारताला दुसऱ्या दिवशी यात फक्त 22 धावांची भर घालता आली.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवशी 22 धावांवर नाबाद असलेल्या रिषभ पंतला दुसऱ्या दिवशी फक्त 2 धावांची भर घालता आली. त्यानंतर तळातल्या फलंदाजांनीही नियमित कालांतराने आपल्या विकेट गमावल्या.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्स(3/75), स्टुअर्ट ब्रॉड(3/72), आदिल रशीद(1/46) आणि जेम्स अँडरसनने(3/64) विकेट्स घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी
–एशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक
–टीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज