नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.
भारताकडून चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून अॅलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्जने सावध सुरुवात केली. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेर एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या होत्या.
मात्र चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला जेनिंग्ज(13) आणि कूकने(17) लवकर विकेट गमावल्या. या दोघांनाही इशांत शर्माने बाद केले. हे दोघेही बाद झाल्यानंतर काही वेळातच इंग्लंडचा कर्णधार जो रुट(13) आणि आॅली पोप(16) हे दोघही स्वस्तात बाद झाले.
मात्र त्यानंतर जॉस बटलर आणि बेन स्टोक्सने इंग्लंडचा डाव सांभाळताना जवळजवळ 57 षटके भारताला एकही विकेट मिळू दिली नाही. या दोघांनी मिळून 5 व्या विकेटसाठी 169 धावांची भागिदारी रचली.
बटलरने त्याचे कसोटीतील पहिले शतक झळकावले. तर स्टोक्सनेही बटलरला साथ देत अर्धशतक केले.
बटलरने 176 चेंडूत 106 धावा करताना 21 चौकार मारले. त्याला बुमराहने पायचीत बाद करत ही जोडी फोडली. बटलरला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोलाही बुमराहने शून्य धावेवर त्रिफळाचीत करत इंग्लंडला 6 वा धक्का दिला.
त्यानंतर काहीवेळातच बुमराहने ख्रिस वोक्सलाही(4) बाद केले. तर हार्दिक पंड्याने 187 चेंडूत 62 धावा करणाऱ्या स्टोक्सला बाद केले. यामुळे इंग्लंडची आवस्था 8 बाद 241 धावा अशी झाली.
यानंतर बुमराहने 87 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर आदिल रशीदला बाद केले होते. मात्र तो चेंडू नो बॉल असल्याने रशीदला जीवदान मिळाले.
त्यानंतर रशीद आणि ब्रॉडने चांगली लढत देताना 9 व्या विकेटसाठी 50 धावांची अर्धशतकी भागिदारी रचली. पण पुन्हा एकदा बुमराहनेच ब्रॉडला 20 धावांवर बाद करत ही जोडीही फोडली.
चौथ्या दिवसाखेर इंग्लंडकडून आदिल रशीद 30 धावांवर आणि जेम्स अँडरसन 8 धावांवर नाबाद खेळत आहेत
भारताकडून चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने 85 धावा देत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर अन्य गोलंदाजांपैकी इशांत शर्मा(2/70), हार्दिक पंड्या(1/22) आणि मोहम्मद शमी(1/76) यांनी विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव- सर्वबाद 329 धावा
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 161 धावा
भारत दुसरा डाव – 7 बाद 352 धावा (घोषित)
इंग्लंड दुसरा डाव – 9 बाद 311 धावा
(आदिल रशीद(30) आणि जेम्स अँडरसन(8) नाबाद खेळत आहेत.)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम
–केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी
–सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?






