मुंबई । पाकिस्तानचा संघ कसोटी आणि टी -20 मालिकेसाठी इंग्लंडमध्येही पोहोचला आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला चौदा दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागले. ही मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फिरकीपटू काशिफ भट्टी हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण संघाची पुन्हा एकदा चाचणी करावी लागू शकते.
काशिफ भट्टी यास पीसीबीने हैदर अली आणि वेगवान गोलंदाज इम्रान खान यांच्यासह इंग्लंड दौर्यावर पाठवले होते. इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांची दोनदा कोरोना त्यांची चाचणी घेण्यात आली होती आणि दोन्ही वेळा नकारात्मक आढळले होते. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर काशिफ भट्टीची दोनदा टेस्ट झाली असून आता तो दोन्ही वेळा पॉझिटिव्ह आढळला आहे.
काशिफ सध्या संघातील इतर खेळाडूंपासून दूर आयसोलेशनमध्ये आहे. काशिफ भट्टी हा इंग्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर कोरोनाची लागण झालेला पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे.
सिंध प्रांतातून आलेला हा खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यात माहिर आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तान संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळला नाही.
प्रथम श्रेणीच्या 84 सामन्यात त्याने 331 बळी टिपले आहेत तसेच अ दर्जाच्या सामन्यात त्याने 146 बळी घेतले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे.
इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानचे दहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात आली. त्यात सहा खेळाडू निगेटीव्ह आले. आता इंग्लंड पोहचल्यानंतर पाकिस्तानच्या संघातील आणखी एका खेळाडूला कोरोना ची लागण झाली आहे.