श्रीलंका संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असून उभय संघांमध्ये तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील साउथम्पटनच्या रोज बाऊल मैदानावर खेळवल्या गेलेल्या तिसर्या टी२० सामन्यात एक आश्चर्यकारक घटना घडल्याचे दिसून आले. या सामन्या दरम्यान श्रीलंकेचा गोलंदाज बिनुरा फर्नांडो आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान यांच्यात टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मलान आणि फर्नांडोची जोरदार धडक
इंग्लंड विरूद्ध श्रीलंकेच्या शनिवारी (२६ जून) खेळवल्या गेलेल्या तिसर्या सामन्यात ही घटना घडल्याचे दिसून आले. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र त्यांचा निर्णय चुकीचा ठरल्याचे सिद्ध झाले. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या डावात २० षटकांत ६ बाद १८० धावा उभारल्या. मात्र याच डावा दरम्यान एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला.
या डावात दुसर्या षटकांत श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो गोलंदाजी करत होता. तर इंग्लंडचा डेव्हिड मलान नॉन-स्ट्राइकर एंडला होता. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाने चेंडू खेळून मलानला धाव घेण्यासाठी कॉल दिला. मात्र त्याचवेळी फर्नांडो देखील चेंडू पकडण्यासाठी धावला. त्यामुळे धाव घेण्यासाठी जाणार्या मलानची आणि त्याची जोरदार टक्कर झाली. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू खाली पडले. मात्र अनेकांना फर्नांडोने जाणूनबुजून धक्का दिला आहे, असे वाटते आहे.
पाहा व्हिडिओ-
— Yuzi.03 (@03Yuzi) June 26, 2021
इंग्लंडचा दणदणीत विजय
दरम्यान, या सामन्यात इंग्लंड संघाने अगदी सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करतांना त्यांनी २० षटकांत ६ बाद १८० धावा केल्या होत्या. डेव्हिड मलानच्या ७६ तर जॉनी बेअरिस्टोच्या ५१ धावांचा समावेश होता. या लक्ष्याचा पाठलाग करतांना श्रीलंकन संघ अवघ्या ९१ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ७६ धावांची खेळी करणाऱ्या डेव्हिड मलानलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या:
‘तो’ एक झेल सोडणे भारतीय संघाला WTC फायनलमध्ये पडले महागात, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे मत
‘हे’ होते १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील सर्वात सभ्य आणि खोडकर खेळाडू, कर्णधाराने केला खुलासा
चौफेर टीका होणार्या भारतीय संघाच्या मदतीला धावला गांगुली, ‘या’ शब्दांत केली पाठराखण