इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या दरम्यानचा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना ४१.१ षटकात १६६ धावांवर सर्वबाद झाला. पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरू न झाल्याने पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजय मिळवला. मालिकेच्या तिन्ही सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणार्या इंग्लंडच्या डेव्हिड विलीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
श्रीलंकेची पुन्हा शरणागती
पहिल्या दोन्ही सामन्यात फ्लॉप गेलेली श्रीलंकेची फलंदाजी तिसऱ्या सामन्यातही ढेपाळली. इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंकेचा कर्णधार कुसल परेरा तिसऱ्या षटकात केवळ ९ धावा काढून माघारी परतला. पंधराव्या षटकापर्यंत श्रीलंकेची अवस्था ५ बाद ६३ अशी झाली. अष्टपैलू दसुन शनाका याने एका बाजूने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेल्याने श्रीलंकेचा डाव अवघ्या १६६ धावांवर गुंडाळला गेला. शनाका ४८ धावा काढून नाबाद राहिला.
इंग्लंडच्या गोलंदाजांचे पुन्हा वर्चस्व
पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला कमी धावसंख्येत रोखले होते. तिसऱ्या सामन्यात देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली. दुसऱ्या सामन्यात पाच बळी मिळवणाऱ्या सॅम करन याचा मोठा भाऊ टॉम करनने यावेळी संघाच्या माऱ्याचे नेतृत्व केले. त्याने चार बळी टिपले. ख्रिस वोक्स व डेव्हिड विली यांनी देखील प्रत्येकी दोन बळी मिळवत त्याला मदत केली. फिरकीपटू आदिल रशिद याला एक बळी मिळाला.
श्रीलंकेची गचाळ कामगिरी
सध्या अनेक संकटातून जात असलेल्या श्रीलंका क्रिकेटला या दौर्यात पूर्णत अपयश आले. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत त्यांना ३-० अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर वनडे मालिकेत तिसरा सामना रद्द झाल्याने त्यांचा व्हाईटवॉश हुकला. श्रीलंकेचा संघ आता भारताविरुद्ध मायदेशात तर, इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मानलं पाहिजे राव! दिल्लीकर फलंदाजाचा टी२०त धुमाकूळ, अवघ्या ७९ चेंडूत झळकावले द्विशतक
अरेरे! ‘बॅट शेजाऱ्याची बायको असते’ म्हणणे दिनेश कार्तिकला पडले महागात, आई अन् पत्नीने खूप ऐकवलं
‘त्याला’ श्रीलंकाविरुद्ध ६ पैकी ६ सामन्यात खेळताना पाहायचंय; बड्या भारतीय क्रिकेटपटूची इच्छा