मुंबई । कोरोना वायरच्या महामारीत क्रिकेट फॅन्ससाठी नुकतीच आनंदाची बातमी आली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी दिली. कोरोना महामारीमुळे फॅन्सला तब्बल तीन महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा ‘लाइव्ह अॅक्शन’ पाहायला मिळणार आहेत.
कोरोना महामारीच्या सावटात होणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आहे. या मालिकेतील सर्व सामने एकाच मैदानावर खेळवले जाणार आहेत. वास्तविक पाहता ही मालिका जून महिन्यात होणार होती, पण कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी ही मालिका पुढे ढकलण्यात आली होती. आता जुलै महिन्यात ही मालिका खेळवण्यात येणार आहे.
जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजचा संघ 9 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल होईल. या दौऱ्याच्या तयारीसाठी वेस्ट इंडिजच्या संघाने यापूर्वीच सरावाला सुरुवात केली असल्याची माहिती वेस्ट इंडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह यांनी दिली होती. दुसरीकडे इंग्लंडचा संघ देखील या मालिकेसाठी वेगवेगळ्या मैदानावर गटागटाने सराव करत आहे. खेळाडू ज्या मैदानात सराव करत आहेत त्या मैदानात प्रेक्षकांना मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.