आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील २७वा सामना इंग्लंड आणि बांगलादेश संघात रविवारी (२७ मार्च) वेलिंग्टन येथे पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने १०० धावांनी जिंकला. इंग्लंडच्या या विजयाची शिल्पकार सोफिया डंकले ठरली. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या विजयासह इंग्लडने स्पर्धेतील आपला चौथा विजय मिळवला. या सोबतच इंग्लंड संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला.
या सामन्यात इंग्लंडने (England Womens) नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्स गमावत २३४ धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश (Bangladesh Womens) संघाचा डाव ४८व्या षटकातच १३४ धावांवर संपुष्टात आला.
बांगलादेशकडून फलंदाजी करताना लता मंडलने सर्वाधिक ३० धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त शमिमा सुलताना आणि शर्मिन अख्तर यांनी प्रत्येकी २३ धावा केल्या. तसेच, कर्णधार आणि यष्टीरक्षक निगर सुलतानाने २२ धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाज २० धावसंख्याही पार करू शकले नाहीत.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना सोफी एक्लेस्टोन आणि शार्लोट डीन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त फ्रेया डेविसने २ आणि कर्णधार हीदर नाईटने एक विकेट खिशात घातली.
तत्पूर्वी इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना सोफिया डंकलेने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली होती. या धावा करताना तिने ८ चौकारांचा पाऊस पाडला. दुसरीकडे नताली सिवरने ४० धावा, टॅमी ब्युमॉन्टने ३३ धावा, यष्टीरक्षक ऍमी जोन्सने ३१ धावा केल्या. तसेच, कॅथरीन ब्रंटने नाबाद २४ धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही.
यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना सलमा खातूनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त जहानारा आलम, रितू मोनी, फाहिमा खातून, लता मंडल यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील उपांत्य सामने
आयसीसी महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेले संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३० मार्च रोजी वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात ३१ मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! पहिल्याच आयपीएल सामन्यात चर्चेत आली ‘मिस्ट्री गर्ल
आजचा सामना: कधी, केव्हा आणि कुठे होणार पंजाब-बेंगलोर सामना, जाणून घ्या एका क्लिकवर