दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीला शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. या फेरीतील दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध गतविजेते वेस्ट इंडिज या संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स विजय मिळवला. यासह स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.
टी२० विश्वचषक इतिहासातील इंग्लंडचा वेस्ट इंडिजविरुद्ध हा पहिलाच विजय ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडला वेस्ट इंडिजला टी२० विश्वचषकात २००९, २०१०, २०१२ आणि २०१६ साली पराभूत व्हावे लागले होते. विशेष म्हणजे २०१६ साली दोन वेळा वेस्ट इंडिजने इंग्लंडला २ वेळा पराभूत केले होते.
इंग्लंडचा विजय
या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला विजयासाठी ५६ धावांचे माफक आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जोस बटलरने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता. पण संघाच्या २१ धावा झाल्या असताना जेसन रॉय ११ धावांवर रवी रामपालच्या गोलंदाजीविरुद्ध ख्रिस गेलकडे झेल देत बाद झाला. पाठोपाठ, जॉनी बेअरस्टोही स्वस्तात बाद झाला. त्याचा ॉ९ धावांवर अकिल हुसेनने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेतला.
यानंतर ६ व्या षटकात मोईन अली धावबाद झाला, तर ७ व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनने विकेट गमावली. लिव्हिंगस्टोनचा झेल अकिल हुसेनने आपल्याच चेंडूवर अप्रतिमरित्या घेतला. पण, यानंतर बटलर आणि इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवले. बटलर २४ धावांवर नाबाद राहिला. तर, मॉर्गन ७ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ८.२ षटकांत ४ विकेट्स गमावत ५६ धावांचे आव्हान पूर्ण केले.
आदील राशिदची शानदार गोलंदाजी
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. इंग्लंडचा हा निर्णय योग्य ठरला. कारण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी या सामन्यात सपशेल निराशा केला. त्यांच्याकडून केवळ ख्रिस गेलला दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्याने १३ धावा केल्या. अन्य कोणताही खेळाडू १० धावांचा आकडाही गाठू शकला नाही.
त्यामुळे, वेस्ट इंडिज संघ १४.२ षटकात ५५ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून आदिल राशिदने शानदार गोलंदाजी करताना २.२ षटकांत २ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मोईन अली आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्स आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत टी२० विश्वचषक जिंकू शकतो; पण ‘या’ तीन संघांपासून रहावे लागेल सावध, सुरेश रैनाचे मत






