भारताचा इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाला. इंग्लंडने भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले. त्यातच आता भारतीय संघासाठी चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी चिंता वाढली आहे. दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतलेला मार्क वूड आणि क्रिस वोक्स चौथ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
वूडने लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीने भारतीय संघाला चांगलाच त्रास दिला होता. अशात त्याच्या सोबतीला आणखी एक खेळाडू क्रिस वोक्स देखील उपलब्ध असल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुढील कसोटी सामन्यात या दोघांची संघात निवड झाल्यास भारतीय संघाला चांगलीच अडचण होऊ शकते.
‘डेली मेल’ या वृत्तपत्राच्या एका माहितीनुसार, मार्क वूड आणि क्रिस वोक्स आता पूर्णपणे तंदुरुस्त झालेले आहेत आणि चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध देखील आहे. वूडने खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यामुळे त्याच्या जागी क्रेग ओव्हर्टनला संघात सामील केले होते.
वूडने लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. अशात वूड आणि वोक्स यांना चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, तर इंग्लंडचा गोलंदाज विभाग आणखी मजबूत होऊ शकतो. दरम्यान ऑली रॉबिन्सन आणि ओव्हर्टनने तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती. तसेच रॉबिन्सनने या सामन्यात ७ विकेट्स घेतल्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता.
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडने भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी नेस्तनाबूत केले. इंग्लंडचा संघ या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर ०-१ ने पिछाडीवर होता. मात्र, तिसऱ्या कसोटीतील या विजयामुळे इंग्लंडने या मालिकेत आता १-१ ने बरोबरी केली आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओवल मैदानात २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हे तर डीव्हीडी सारखे’, विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी इंग्लिश कर्णधाराने उडवली खिल्ली
–शाकिब अल हसनने निवडला सर्वकालीन वनडे संघ; धोनीला केले कर्णधार, तर या दोन भारतीयांनाही स्थान
–रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलच्या गावात गावकऱ्यांनी गरबा खेळून ऐतिहासिक विजय केला साजरा