लीड्स। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले मैदानावर झाला. या सामन्याचा शनिवारी (२८ ऑगस्ट) चौथा दिवस होता. या दिवशी भारतीय फलंदाजांच्या हाराकिरीमुळे इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
दुसऱ्या डावात ३५४ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताने सुरुवात चांगली केली होती. भारताकडून रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली होती. मात्र, नंतर मधली आणि खालची फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे भारताचा दुसरा डाव ९९.३ षटकांत २७८ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्ससने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर क्रेग ओव्हरटनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
रॉबिन्सन समोर भारतीय फलंदाज अपयशी
चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात ८१ षटकांपासून आणि २ बाद २१५ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाखेर नाबाद असेलेली विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची जोडी मैदानात उतरली असून पुजाराने ९१ धावांपासून आणि विराटने ४५ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
मात्र, यांची जोडी चौथ्या दिवशी फार काळ टिकू शकली नाही. ८४ व्या षटकात ऑली रॉबिन्सनने पुजाराला पायचीत केले. यावेळी पंचांनी सुरुवातीला पुजाराला नाबाद ठरवले होते. मात्र, इंग्लंडने रिव्ह्यूची मागणी केली. त्यामध्ये पुजारा बाद असल्याचे दिसल्याने मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. पुजारा चौथ्या दिवशी एकही धावा न जोडता ९१ धावांवर बाद झाला. त्याने या खेळीदरम्यान १८९ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार मारले.
तो बाद झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे कर्णधार विराटला साथ देण्यासाठी मैदानावर उतरला. दरम्यान, विराटला ८७ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मैदानावरील पंचांनी बाद ठरवलं होतं. मात्र, विराटने डीआरएसचा वापर करत आपली विकेट वाचवली. त्यानंतर त्याने ९० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या कसोटी मालिकेतील पहिले अर्धशतक आहे. तर कारकिर्दीतील २६ वे कसोटी अर्धशतक आहे.
मात्र, अर्धशतक पूर्ण करताच तो ९० व्या षटकाच्याच अखेरच्या चेंडूवर ५५ धावांवर बाद झाला. त्याला रॉबिन्सनने जो रुटच्या हातून झेलबाद केले. त्यापाठोपाठ ९१ व्या षटकाच जेम्स अँडरसनने रहाणेला यष्टीरक्षक जोस बटलर करवी १० धावांवर झेलबाद करत माघारी पाठवले. त्यापाठोपाठ ९२ व्या षटकात रॉबिन्सनने आणखी एक धक्का दिला. त्याने रिषभ पंतला १ धावेवर बाद केले.
त्यानंतर मोहम्मद शमीला मोईन अलीने ९५ व्या षटकात त्रिफळीचीत केले. तर ९६ व्या षटकात इशांत शर्माला रॉबिन्ससने बाद करत डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अखेर १०० व्या षटकात क्रेग ओव्हरटनने रविंद्र जडेजाला ३० धावांवर आणि मोहम्मद सिराजला शुन्यावर बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला.
त्यामुळे भारताची अवस्था ९२ षटकांत ६ बाद २३९ धावा झाली असून अजून ११५ धावांची पिछाडी भारताला भरुन काढायची आहे.
तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ७८ धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावा करत ३५४ धावांची आघाडी मिळवली होती.