मुंबई । इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पण या कसोटी सामन्यातही पाऊस आणि खराब प्रकाशामुळे बराच वेळ वाया गेला. चौथ्या दिवशीही पाऊस सतत हजेरी लावत असल्याने सामन्यात व्यत्यत येत होता. खेळ वेळेच्या आधी थांबण्यापूर्वी, फॉलोऑन मिळालेल्या पाकिस्तानने दोन विकेट गमावून 100 धावा केल्या होत्या.
दिवसभरात फक्त 56 षटकांचा खेळ झाला. पाकिस्तानचा संघ अजून 210 धावांनी मागे आहे. इंग्लंडने पहिल्या डावातील आठ विकेट्ससह 583 धावांवर घोषित केला होता. पहिल्या डावात पाकिस्तानने 273 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या शेवटी कर्णधार अझर अली 29 आणि बाबर आझम चार धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, 24 व्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडने शॉन मसूदला पायचीत केले आणि पाकिस्तानच्या दुसर्या डावातील पहिला विकेट घेतला. त्याच वेळी, 600 कसोटी विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याच्या उंबरठ्यावर उभे असताना जेम्स अँडरसनने आबिद अली याला 42 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अँडरसनने आतापर्यंत 599 कसोटी विकेट घेतले आहेत.
पहिल्या सत्रात पाचव्या षटकातील अँडरसनचा चेंडू शानच्या बॅटला लागला आणि यष्टीरक्षक जोस बटलरकडे गेला पण तो झेल पकडण्यात अपयशी ठरला. यापूर्वी तिसर्या दिवशीही रोरी बर्न्स आणि जॅक क्रॉलीने त्याच्या चेंडूवर झेल सोडला. पाकिस्तानच्या दोन्ही डावात आतापर्यंत अँडरसनच्या चेंडूंवर चार वेळा झेल सोडले आहेत.
सामना पाकिस्तानच्या हाताबाहेर गेला आहे. आता ते फक्त अनिर्णित राहण्याची आशा बाळगू शकतात आणि त्यासाठी हवामानाच्या सहकार्याची गरज आहे. इंग्लंड प्रथम कसोटी सामना जिंकत मालिकेत १-०ने पुढे आहे. हा सामना अनिर्णीत राहिल्यास 10 वर्षांत पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा हा पहिला विजय असेल. नुकतेच त्यांनी वेस्ट इंडीजवर 2-1 अशी मात केली.