काल (४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवला. ही मालिका इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली असली तरी आयर्लंडने शेवट मात्र विजयासह गोड केला. याबरोबरच या सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक खास विक्रमही केला आहे.
या सामन्यात दोन्ही संघातील कर्णधारांकडून शतकीय प्रदर्शन पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून कर्णधार ओएन मॉर्गनने ८४ चेंडूत दमदार फटकेबाजी करत १०६ धावांची शतकी खेळी केली. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ४९.५ षटकात सर्वबाद ३२८ धावा केल्या होत्या. तसेच आयर्लंडला विजयासाठी ३२९ धावांचे आव्हान दिले होते.
या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीने ११२ चेंडूत १२ चौकार मारत ११३ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्यामुळे वनडेतील एका सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधरांनी शतकी खेळी करण्याची ही पाचवी वेळ ठरली. याआधी ४ वेळा असे घडले आहे. तसेच इंग्लंडमध्ये एकाच वनडेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतके करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्वात पहिल्यांदा वनडेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतके करण्याची घटना २०१३ ला डब्लिन येथे झालेल्या आयर्लंड विरुद्ध इंग्लंड संघातील सामन्यात घडली होती. त्यावेळी आयर्लंडचा कर्णधार विल्यम पॉर्टरफिल्डने ११२ धावा तर इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने नाबाद १२४ धावा केल्या होत्या.
त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये फतुल्लाह येथे बांगलादेश विरुद्ध भारत संघात झालेल्या सामन्यात दुसऱ्यांदा असे घडले. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुर रहीमने ११७ धावा तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने १३६ धावांची खेळी केली होती. त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये रांची येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या वनडे सामन्यातही दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतके केली होती. विशेष म्हणजे त्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रत्येकी नाबाद १३९ धावा केल्या होत्या.
एकाच वनडेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतके करण्याच्या यादीत विराट कोहलीचे नाव तीन वेळा आले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात झालेल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डु प्लेसिसने १२० धावांची तर भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ११२ धावांची खेळी केली होती.
इंग्लंडविरुद्ध पॉल स्टर्लिंगनेही केले शतक –
काल पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील वनडे सामन्यात आयर्लंडकडून बालबिर्नीव्यतिरिक्त पॉल स्टर्लिंगने १४२ धावांची खेळी केली होती. त्याने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकार मारत ही खेळी केली. बालबिर्नी आणि स्टर्लिंग यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे आयर्लंडने हा सामना सहज जिंकला.
एकाच वनडे सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतके करण्याच्या घटना –
विल्यम पॉर्टरफिल्ड (११२) आणि ओएन मॉर्गन (१२४*) – आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, डब्लिन, २०१३
मुशफिकुर रहीम(११७) आणि विराट कोहली (१३६) – बांगलादेश विरुद्ध भारत, फतुल्लाह, २०१४
अँजेलो मॅथ्यूज(१३९*) आणि विराट कोहली(१३९*) – श्रीलंका विरुद्ध भारत, रांची, २०१४
फाफ डु प्लेसिस(१२०) आणि विराट कोहली(११२) – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, डर्बन, २०१८
अँड्र्यू बालबिर्नी(११३) आणि ओएन मॉर्गन (१०६) – आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, साऊथँम्पटन, २०२०
महत्त्वाच्या बातम्या –
एक फलंदाज तर दुसरा अष्टपैलू, २ रिटायर क्रिकेटर रोहितला हवे आहेत मुंबई इंडियन्समध्ये
टीम इंडिया आता वापरणार नवी जर्सी, बीसीसीआयने काढले नविन टेंडर
युवराज, निवड समिती सदस्य तुझ्याकडे पहात सुद्धा नाहीत; या खेळाडूने युवीला सांगितले होते कटू सत्य
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: आमीर सोहेलला “पेहली फुरसत से निकल” म्हणणारा वेंकटेश प्रसाद
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
आजच्याच दिवशी ८८ वर्षांपूर्वी सीके नायडूंनी मारला होता तो ऐतिहासिक षटकार