ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने सोमवारी (२६ एप्रिल) झालेल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत पंजाब किंग्ज संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मॉर्गनने नाबाद ४७ धावांची खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर मॉर्गनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच हा पुरस्कार स्विकारल्यानंतर त्याने भारतीयांसाठी मन जिंकणारे भाष्य केले आहे.
या सामन्यात कोलकाता संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली होती. याबाबत सामना झाल्यानंतर कोलकाता संघाचा कर्णधार मॉर्गन म्हणाला की, “आम्ही हा विजय सहजरित्या मिळवला नाही. गोलंदाजांनी पंजाब संघातील फलंदाजांना नियंत्रणात गोलंदाजी करून थांबवले. मी तर कधी एकसोबत ३ षटक देखील गोलंदाजी करू देत नाही. शिवम मावीचे आकडे ख्रिस गेलविरुद्ध चांगले होते. त्यामुळे मी त्याच्याकडून ४ षटक पूर्ण करून घेतले.”
पुढे भारताताली कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात बोलताना मॉर्गन म्हणाला की, “आम्ही आता विश्रांती घेणार नाही. आम्हाला इथून पुढे निघायचं आहे. या स्पर्धेत आणखी खूप वेळ शिल्लक आहे. बाहेर जे काही घडत आहे. त्यामध्ये आम्ही आमचे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. कोलकाता संघाकडून आणि माझ्याकडून मी भारतातील आणि जगभरातील सर्वांसाठीच चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतो. आपण सर्व एकत्र येऊन यावर विजय मिळवू शकतो.”
पंजाब किंग्ज संघातील फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब संघाकडून, मयंक अगरवाल याने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली तर ख्रिस जॉर्डनने ३० धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच कर्णधार केएल राहुल अवघ्या १९ धावा करत माघारी परतला होता. २० षटक अखेर पंजाब किंग्ज संघाला १२३ धावा करण्यात यश आले होते
कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिळवला एकहाती विजय
पंजाब संघाने दिलेल्या १२४ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाकडून कर्णधार ओएन मॉर्गनने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली होती. तर राहुल त्रिपाठीने ४१ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच शुबमन गिल आणि नितीश राणा या सामन्यात देखील फ्लॉप ठरले. कोलकाता संघाने २० चेंडू शिल्लक असताना ५ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला. तसेच त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यात त्यांना २ विजय मिळवण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सनराझर्समागचं दृष्टचक्र संपेना, संघ पिछाडीवर असताना कर्णधार उर्रवित हंगामातून घेणार माघार?
काय डोकं लावलंय! यष्टीरक्षकाचं लक्ष विचलित करण्यासाठी फलंदाजाने नकळत फेकली बॅट अन् वाचवली विकेट
Video: जॉर्डनने दोन षटकार मारल्याने चिडला प्रसिद्ध कृष्णा, विकेट घेतल्यानंतर दाखवली ‘दादागिरी’!