सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. युएई व ओमान येथे विश्वचषकाच्या पात्रतेचे सामने सुरू झाले असून, २३ ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू व समालोचक मायकल स्लेटर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद केली गेली आहे.
या कारणाने झाली अटक
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू राहिलेल्या मायकल स्लेटर याला न्यू साउथ वेल्स येथील स्थानिक पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. मागील आठवड्यात घडलेल्या कथित घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली ही अटक केली गेली आहे. घरगुती हिंसाचाराच्या आरोपांचा एक आठवडा तपास केल्यावर स्लेटरला मॅन्ली येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कथित घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घडलेल्या कथित घरगुती हिंसाचाराच्या घटनेचा अहवाल मंगळवारी ईस्टर्न उपनगर पोलिस एरिया कमांडशी संबंधित अधिकाऱ्यांना मिळाला. यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्याला मॅन्ली येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी ताब्यात घेतले गेले.
दैदिप्यमान राहिली कारकीर्द
जवळपास १० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या स्लेटर याने आपल्या कारकीर्दीत ७४ कसोटी सामने करताना ५३१२ धावा काढल्या होत्या. तसेच, ४२ वनडे सामने खेळताना ९८७ धावा त्याने जमवल्या आहेत. त्याने आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत जवळपास १५००० धावा फटकावलेल्या. निवृत्तीनंतर तो प्रसिद्ध समालोचक म्हणून काम पाहतो. आयसीसी स्पर्धा तसेच अनेक फ्रॅंचाईजी क्रिकेट लीगमध्ये तो समालोचन करताना दिसून येतो. आयपीएलच्या पूर्वर्धानंतर त्याची आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची मालदीवमध्येे भांडणे झाली होती.