भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात या वर्षाच्या अखेरीस रोमांचक बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. या मोठ्या ट्रॉफीसाठी भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. दोन दशकांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. गेल्या 2 वर्षांत बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारताची कामगिरी आश्चर्यकारक राहिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आता पुन्हा एकदा भारतीय संघाला इतिहासाची पुनरावृत्ती करायला आवडेल. या आगामी रोमांचक मालिकेबाबत बीसीसीआयच्या माजी मुख्य निवडकर्त्यानेही मोठे वक्तव्य केले आहे.
बीसीसीआयचे माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी ‘रेव्ह स्पोर्ट्स’वर बोलताना बॉर्डर गावसकर ट्रॉफीबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ‘एक काळ असा होता की जेव्हा आपण ऑस्ट्रेलियाला गेलो तर काय होईल. आपण तिथे कामगिरी कशी करणार? याची चिंता करायचो. पण गेल्या दोन दौऱ्यांवर आपण ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांना पराभूत केलंय. पूर्वी ऑस्ट्रेलिया आपल्याला हलक्यात घेत असे, पण आता त्यांना माहित आहे की भारताला हरवायचे असेल तर त्यांना पूर्ण ताकद लावून खेळावे लागेल. आपण ही प्रतिष्ठा निर्माण केली आहे.’
चेतन शर्मा पुढे म्हणाले की, ‘आपण सध्या जगातील नंबर 1 रँकिंगचा संघ आहोत. आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांना फक्त खडतर झुंज देणार नाही तर त्यांना त्यांच्याच घरातून पळवून लाऊ. मला खेळाडूंवर खूप विश्वास आहे.’
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांची कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली जाणार आहे. ही मालिका जिंकत दोन्ही संघ स्पर्धेतील अंतिम फेरीतील त्यांचा दावा मजबूत करू शकतात. 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी दरम्यान ही कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा –
WTC फायनलच्या फॉरमॅटमध्ये बदल करण्याची मागणी, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची आयसीसीला महत्त्वपूर्ण सूचना
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?
महाराष्ट्राच्या पठ्ठ्याचा पॅरिसमध्ये डंका! सांगली जिल्ह्यातील सचिन खिलारीनं पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं रौप्य पदक