देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे हे स्वप्न असते की, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावे. परंतु अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होते; तर काहींना फक्त देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा खेळून समाधान मानावे लागते. असाच एक क्रिकेटपटू आहे, ज्याने एकेकाळी सौरव गांगुलीच्या विरुद्ध गोलंदाजी केली होती. परंतु तोच क्रिकेटपटू दोन वेळेचं जेवण मिळवण्यासाठी देखील संघर्ष करताना दिसून येत आहे.
एकेकाळी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये सौरव गांगुलीला गोलंदाजी करणारा प्रकाश भगत हा सध्या आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. तो सध्या आसामच्या सिलीचरमध्ये फूड स्टॉल लावतो. एकेकाळी त्याला आसामच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणले जात असे. त्याने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आसामचे प्रतिनिधित्व केले आहे.
प्रकाश भगत हा उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज सध्या आपल्या ६ सदस्यांच्या कुटुंबाचे पालन करण्यासाठी ‘डाळ पुरी’ विकायचे काम करत आहे. त्याने २००९-१० आणि २०१०-११ मध्ये रेल्वे आणि जम्मू काश्मीर संघाविरुद्ध रणजी ट्रॉफी सामने खेळले होते. तसेच त्याने २००३ मध्ये बेंगलोर येथे असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देखील घेतले होते. (Ex Ranji trophy player who bowled sourav ganguly is now selling dal puri)
माध्यमातील वृत्तानुसार भगतने म्हटले की, “एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत असताना, मी सौरव गांगुलीला गोलंदाजी केली आहे. त्यावेळी न्यूझीलंडला जाणारा संघ एनसीएमध्ये सराव करत होता. त्यावेळी मला सौरव गांगुलीसह सचिन तेंडुलकर, जहीर खान, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना भेटण्याची संधी मिळाली होती.
तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्या वडिलांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे मला २०११ ला क्रिकेट सोडावे लागले होते. माझे वडील आणि मोठा भाऊ दीपक हे दोघेही भेळपुरीची गाडी लावायचे. वडीलांच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ देखील आजारी पडला.” दिपकचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत.
भगतने आसाम क्रिकेट असोिएशनकडे मदत करण्याची मागणी केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, जर त्याला आर्थिक मदत मिळत असेल तर तो पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे. तसेच तो पुढे म्हणाला,”मी क्रिकेट सोडल्यानंतर कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी मोबाईल कंपनीमध्ये नोकरी करू लागलो होतो. परंतु कोविड-१९ मुळे मला नोकरी गमवावी लागली होती.”
भगतच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात १९९९ मध्ये सिलीचर जिल्हा क्रीडा मंडळाच्या १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतून झाली होती. त्यानंतर त्याने १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील वयोगटात अनेक स्पर्धा खेळल्या. भगत म्हणाला की, “या स्पर्धांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर मला आसामच्या रणजी संघात स्थान मिळाले होते. मी सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या संघात देखील होतो.”
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेहून आली आनंदाची बातमी, हार्दिक पंड्या ‘बहुप्रतिक्षित’ भूमिकेत मैदानावर उतरणार
सुरेख भेट! जाळ अन् धूर संगठच काढत चाहत्याने धोनीसाठी बनवले अतिसुंदर गिफ्ट; एकदा पाहाच
त्यावेळी एमएस धोनी बनला होता चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!