गुरुवारी (३० सप्टेंबर) आयपीएल २०२१ मधील ४४ वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमने सामने होते. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. यासह १८ गुणांसह चेन्नई संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये शानदार प्रवेश केला आहे. हा सामना झाल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिसने हे घवघवीत यश मिळवण्यामागे प्रमुख कारण काय आहे याचा खुलासा केला आहे.
मागील हंगाम राहिला होता निराशाजनक
गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थित चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. या संघाने १४ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना अवघ्या ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आलेले. तर याच संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
काय म्हणाला प्लेसीस
सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर, सलामीवीर फाफ डू प्लेसिस म्हणाला की, “आम्ही हंगाम सुरू होण्यापूर्वी खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला मी धावा करण्यात अपयशी ठरलो होतो. आमची फलंदाजी लाईनअप खूप मोठी आहे. आमच्या संघात असे काही फलंदाज आहेत, जे नेहमी आक्रमक फलंदाजी करतात. त्यामुळे एक फलंदाज बाद झाला तर दुसरा फलंदाज धावा करण्यासाठी तयार असतो. तर, मोईन अली फिरकी गोलंदाज म्हणून महत्वाची भूमिका पार पाडत आहे. हेच मुख्य कारण आहे की, आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे.”
चेन्नईचा हैदराबाद संघावर शानदार विजय
या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. तर, अभिषेक शर्माने १८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ४५ आणि फाफ डू प्लेसिसने ४१ धावांचे योगदान देत चेन्नई सुपर किंग्स संघाला हा सामना ६ गडी राखून जिंकून दिला.