…म्हणून आज टॉससाठी विराटसह उपस्थित होते दक्षिण आफ्रिकेचे ‘दोन’ कर्णधार, पहा व्हिडिओ

रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र या सामन्यात नाणेफेकीवेळी क्रिकेटमधील दूर्मिळ गोष्ट पहायला मिळाली. नाणेफेकीवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डूप्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज तेंबा बाऊमालाही बरोबर घेऊन आला होता. त्यामुळे नाणेफेकीसाठी 3 खेळाडू एकाचवेळी उपस्थित राहण्याची अनोखी गोष्ट पहायला मिळाली.

फाफ डूप्लेसिस मागील काही सामन्यांपासून नाणेफेक पराभूत होत असल्याने त्याने आज बाऊमाला बरोबर आणले होते.

त्यामुळे विराटने जेव्हा नाणेफेकीचे नाणे उडवले त्यावेळी बाऊमाने कॉल दिला. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकेला त्याचा फायदा झाला नाही अखेर विराटने नाणेफेक जिंकली. त्यामुळे अखेर नाणेफेक झाल्यानंतर विराट आणि डूप्लेसिस एकमेकांकडे पाहून हसले.

या नाणेफेकीबद्दल डूप्लेसिस म्हणाला, ‘नशीबाला साथ द्यायचीच नाही असेच दिसत आहे. ही नाणेफेक महत्त्वाची होती. ही सुकलेली खेळपट्टी वाटत आहे. आम्ही जेव्हा फलंदाजीला येऊ तेव्हा आम्हाला धावा करणे गरजेचे आहे.’

डूप्लेसिस मायदेशाबाहेर कसोटी सामन्यात सलग सातव्यांदा नाणेफेक हरला आहे. विशेष म्हणजे मायदेशाबाहेर याआधीच्या नाणेफक हरलेल्या सहाही सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागला आहे.

याआधीही कर्णधाराऐवजी संघातील दुसऱ्या खेळाडूने केली आहे नाणेफेक –

विशेष गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधाराऐवजी संघातील दुसऱ्या खेळाडूने नाणेफेक करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये फाफ डु प्लेसिसनेच झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 सामन्यासाठी क्विंटॉन डीकॉकला नाणेफेकीसाठी पाठवले होते. विशेष म्हणजे त्या सामन्यात डीकॉक खेळलाही नव्हता. त्यावेळी डीकॉकने नाणेफेक जिंकली होती.

तसेच काही दिवसांपूर्वी 29 सप्टेबरला ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एसिसा हेलीसह नाणेफेकीसाठी उपस्थित होती.

यावेळी नाणेफेकीचे नाणेही हेलीने उडवले. या नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता. त्यावेळीही नाणेफेक सतत पराभूत होत असल्याने लेनिंगने हेलीला बरोबर आणले होते.

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.