आयपीएलच्या या हंगामात नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. संघाला सलग तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 7 एप्रिल (रविवार) रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.
मुंबईचा घरच्या मैदानावरील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात त्यांचा राजस्थान रायल्सकडून पराभव झाला होता. त्या सामन्यात चाहत्यांनी हार्दिक पांड्याविरुद्ध जोरदार हूटिंग केली होती. वास्तविक, रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधार केल्यापासून चाहते नाराज आहेत. मुंबईची टीम जिथेही मॅच खेळण्यासाठी जात आहे, तेथे चाहते हार्दिकविरोधात बूइंग करत आहेत. गुजरात विरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही चाहत्यांनी हार्दिक विरुद्ध जोरदार हूटिंग केली होती.
आता दिल्ली विरुद्ध घरच्या मैदानावरही चाहते हार्दिकला बूइंग करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं एक मोठं वक्तव्य केलं. गांगुली हार्दिक पांड्याच्या समर्थनात उतरला आहे. त्यानं चाहत्यांना हार्दिकविरुद्ध हूटिंग न करण्याचं आवाहन केलंय. सौरव गांगुलीच्या मते, हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आलं यात त्याची चूक नाही.
सौरव गांगुली पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, “मला वाटत नाही की चाहत्यांनी हार्दिक पांड्याविरुद्ध हूटिंग करावी. फ्रँचायझीनं त्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या देशाचं किंवा राज्याचं नेतृत्व करता तेव्हा असं घडतं. जर आपण रोहित शर्माकडे बघितलं तर, फ्रँचायझी तसेच भारतासाठी कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याची कामगिरी वेगळ्या पातळीवरची आहे. मात्र कर्णधारपदी नियुक्ती ही हार्दिकची चूक नाही.”
आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सनं ट्रेडिंग विंडोद्वारे हार्दिक पांड्याला संघात समाविष्ट केलं होतं. हार्दिकनं मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं होतं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीला आकार देण्यात मुंबई इंडियन्सनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईनं 2015 मध्ये हार्दिकला 10 लाख रुपयांना खरेदी केले होतं. हार्दिक 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग आहे. 2021 च्या आयपीएल हंगामापर्यंत तो मुंबईसोबत राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी एवढा आवाज कधीच ऐकला नव्हता”, धोनीच्या मैदानातील एंट्रीवर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया
‘थाला’ला पाहण्यासाठी काहीही! हैदराबादमध्ये चाहत्यांनी तोडले स्टेडियमचे बॅरिकेड्स, पोलिसांकडून कारवाई
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अभिषेक शर्माची एंट्री, पर्पल कॅपवर मोहित शर्माचा ताबा