टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड दौऱ्याआधी रोहितने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. याशिवाय रोहितने टी-20 विश्व कप 2024 जिंकल्यानंतर टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली होती, आता रोहित आयपीएल शिवाय वनडे क्रिकेटमध्ये चाहत्यांना खेळताना दिसणार आहे. तसेच चाहत्यांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला फलंदाजी करताना बघण्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टीम इंडिया जूनमध्ये इंग्लंड दौरा करणार आहे. 20 जून पासून या दौऱ्याची सुरुवात होईल, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ऑगस्टपर्यंत खेळली जाईल, त्यामुळे लवकरच टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली जाईल. रोहितने निवृत्ती घेतल्यामुळे तो या संघाचा हिस्सा असणार नाही. त्याच्या ठिकाणी शुबमन गिलकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असू शकते.
इंग्लंड मालिकेनंतर टीम इंडिया ऑगस्टमध्ये बांगलादेशचा दौरा करेल. या दौऱ्यावर भारत-बांगलादेश संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसेल. मालिकेतील पहिला वनडे सामना 17 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. तसेच दुसरा आणि तिसरा सामना 20 आणि 23 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका सुद्धा खेळली जाईल, पण रोहित ने टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो या मालिकेचा हिस्सा असणार नाही.
चाहत्यांना रोहित शर्मा आता फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल. त्याच्याकडे खूप वेळ असेल त्यामुळे, चाहत्यांना आशा आहे की रोहित शर्मा 2027 पर्यंत वर्ल्डकप खेळणे सुरू ठेवेल.