भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ड्रीम ११ ला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० चे मुख्य प्रायोजक म्हणून निवडले आहे. यापूर्वीच बीसीसीआयशी संलग्न असलेल्या, ड्रीम ११ ने टाटा सन्सला मागे टाकत आयपीएलच्या १३व्या हंगामाचे प्रायोजकत्व जिंकले आहे.
ड्रीम ११ आणि टाटा सन्स व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख प्रायोजक असलेल्या बायजूस व अनअकॅडमी यांनी आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी निविदा भरली होती. ड्रीम ११ ने १९ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी २२२ कोटींची बोली लावल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.
अनेक लोक, क्रीडा स्पर्धा दरम्यान फॅन्टसी गेम खेळत असतात. आपले आपले क्रीडाविषयक ज्ञान वापरून त्याद्वारे काही पैसे कमवणे हा यामागील हेतू असतो.
भारतात फॅन्टसी लीगच्या व्यवसायात कोरोनाच्या काळात कोणताही फरक पडला नाही. फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्स (एफआयएफएस) आणि केपीएमजी यांच्या अहवालानुसार, गेल्या एका वर्षात फॅन्टसी लीगच्या उत्पन्नात जवळपास तीन पट वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये जो महसूल ९२० कोटी होता, तो २०१९-२० मध्ये वाढून २४७० कोटी झाला आहे.
२०१९-२० मध्ये स्पर्धा प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश फीद्वारे लोकांनी १६,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. २०१८-१९ मध्ये ते ६ हजार कोटी होते. २०१६ मध्ये १० फॅन्टसी लीग ऑपरेटर होते, जे २०१९ मध्ये वाढवून १४० झाले.
ड्रीम ११ चे सर्वाधिक ७.५ करोड वापरकर्ते
फॅन्टसी लीगच्या वापरकर्त्यांविषयी बोलताना, ड्रीम ११ चे सर्वाधिक ७.५ कोटी वापरकर्ते आहेत. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांचे प्रसिद्ध क्रिकेटपटू ड्रीम ११ सोबत जोडलेले आहेत. २०१८-१९ मध्ये त्याचा महसूल सुमारे ७७५ कोटी रुपये होता. यावेळी, या फॅन्टसी लीग कंपनीने जाहिरात आणि प्रचारासाठी तब्बल ७८५ कोटी रुपये खर्च केले. ड्रीम ११ हा बीसीसीआय आणि आयपीएलचादेखील प्रायोजक आहे.
याशिवाय, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली माय-११ सर्कल, वीरेंद्र सेहवाग माय टीम-११ आणि युवराज सिंग हा बल्लेबाजी या फॅन्टसी लीग कंपन्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. यंदा आयपीएल न झाल्यास या सर्व कंपन्यांचा महसूल ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
८५% लोक लावतात क्रिकेटवर पैसे
निसंशयपणे क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त लोक हे क्रिकेट वरच पैसे लावत असलेले दिसून येते. २०१९ मध्ये जवळपास ८५% लोकांनी क्रिकेटवर पैसे लावले होते. परंतु, मागील ३-४ वर्षापासून क्रिकेटसोबतच कबड्डी, फुटबॉल आणि बॅडमिंटन सारख्या इतर लीग सुरू झाल्याने क्रिकेट फॅन्टसी गेम वर याचा थोडासा परिणाम झालेला आहे. २०१६ साली एकट्या क्रिकेटवर ९५% लोक पैसे लावत.
ड्रीम-११ चे सह संस्थापक हर्ष जैन यांनी सांगितले, ” कोरोना महामारी मुळे बहुतांश खेळ बंद आहेत. लॉकडाउनच्या काळात भारतीयांनी फॅन्टसी गेम म्हणून बेलारुसमधील फुटबॉल, ताजिकिस्तानातील बास्केटबॉल आणि तैवान येथील बेसबॉल स्पर्धांमध्ये गुंतवणूक केली. फॅन्टसी लीग गेममध्ये आयपीएल सर्वात मोठी गुंतवणूक आणि व्यवसायाची संधी आहे. परंतु या जागतिक संकटामुळे सध्यातरी आयपीएल स्थगित झाली आहे.”
भारत बनणार फॅन्टसी स्पोर्ट्सची सर्वात मोठी बाजारपेठ
निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी असे म्हटले आहे की, ” येत्या काळात भारत फॅन्टसी स्पोर्ट्सचा सर्वेसर्वा असेल. सोबतच या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असतील.”