बुधवारी (16 ऑक्टोबर) दर्शनाम स्पोर्ट्स अँड एज्युकेशन अकादमी क्रिकेट मैदान, बडोदा येथे विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघ विरुद्ध ओडिसा संघांत 50 षटकांचा सामना पार पडला. या सामन्यात उत्तर प्रदेशने ओडिसा संघावर 5 विकेट्सने विजय मिळवला.
उत्तर प्रदेशच्या विजयात मोहसीन खानने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 6 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने हॅट्रिकही साजरी केली.
त्याने गोलंदाजीला येताच विरोधी संघातील खेळाडूंचे विकेट्स घ्यायला सुरूवात केली. सर्वप्रथम त्याने गोविंद पोदारला 24 धावांवर माघारी पाठवले. यानंतर त्याने सुजित लेनकाला 2 धावांवर पायचित केले. सुर्यकांत प्रधानला 8 धावांवर बाद केले.
त्यानंतर मोहसीनने 42व्या षटकात राजेश मोहंती, देवव्रत प्रधान आणि पप्पू रायचा यांची सलग तीन चेंडूत विकेट घेत विकेट्सची हॅट्रिक घेतली. राजेश एक धावेवर तर देवव्रत आणि पप्पू हे शुन्यावर बाद झाले.
मोहसीनच्या गोलंदाजीपुढे ओडिसा संघाचे सर्व खेळाडू 41.4 षटकांत फक्त 128 धावांवर बाद झाले. त्यामुळे उत्तर प्रदेश संघापुढे सामना जिंकण्यासाठी 129 धावांचे लक्ष मिळाले. ते उत्तर प्रदेशने 5 खेळाडू राखून 29.3 षटकात सहज पूर्ण केले.
या सामन्यात मोहसीनने 8.4 षटके गोलंदाजी करताना 27 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त उत्तरप्रदेशकडून सौरव कुमारने 2, शिवम मावी आणि रिंकू सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मोहसीन खानचा 2018च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात समावेश होता. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.