fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हिटमॅन रोहित शर्माने धोनीच्याच मैदानात धोनीचाच विक्रम टाकलाय मागे!

रांची। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कालपासून(19 ऑक्टोबर) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आज द्विशतकी खेळी केली आहे.

त्याने 255 चेंडूत 212 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. या बरोबरच रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये 50 षटकारांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे.

याबरोबरच रोहित कसोटीमध्ये सर्वात जलद 50 षटकार पूर्ण करणारा भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे. त्याने कसोटीत 51 व्या डावात खेळताना 50 षटकारांचा टप्पा पार केला आहे. याआधी हा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. धोनीने कसोटीत 78 डावात 50 षटकार पूर्ण केले होते.

रोहितचे आता कसोटीमध्ये 51 डावात 51 षटकार पूर्ण झाले आहेत.

सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत भारताने पहिल्या डावात 104 षटकात 6 बाद 419 धावा केल्या आहेत. भारताकडून रोहितबरोबरच अजिंक्य रहाणेने 115 धावांची शतकी खेळी केली आहे. तसेच रोहित आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारीही केली आहे.

#कसोटीमध्ये सर्वात जलद 50 षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –

51 डाव – रोहित शर्मा

78 डाव – एमएस धोनी

92 डाव – विरेंद्र सेहवाग

154 डाव – कपिल देव

161 डाव – सौरव गांगुली

#कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज –

90 षटकार – विरेंद्र सेहवाग

78 षटकार – एमएस धोनी

69 षटकार – सचिन तेंडूलकर

61 षटकार – कपिल देव

57 षटकार – सौरव गांगुली

51 षटकार – रोहित शर्मा

You might also like