क्रिकेटमध्ये तुम्हाला संघात स्थान मिळवण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. परंतु, क्वचितच असा खेळाडू असेल ज्याने संघात पुनरागमन करण्यासाठी तब्बल १० वर्ष वाट पाहिली असेल. या कालावधीत अनेक खेळाडू पुनरागमन करण्याचं सोडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असतात.परंतु पाकिस्तान संघातील फलंदाज फावद आलमने या सर्व गोष्टींना अपवाद ठरवले आहे.त्याने जोरदार पुनरागमन तर केले. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डला जोरदार प्रत्युत्तर देखील दिले आहे.
फावद आलमने २००९ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला अवघे २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. परंतु, कोणालाच असे वाटले नव्हते की, या धाकड फलंदाजाला संघाबाहेर करून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याला पुनरागमन करण्याची संधी देणार नाही.
तब्बल १० वर्ष उलटून गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला फावद आलमची आठवण झाली आणि त्याला गतवर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. पुनरागमन केल्यानंतर पहिल्याच सामन्यात तो भोपळाही न फोडता माघारी परतला होता.
परंतु, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. फावदने गेल्या एक वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने या एका वर्षात ४ शतकं झळकावले आहेत. त्याच्या नावे आता ५ शतकांची नोंद झाली आहे. हे पाचही शतक त्याने ५ वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या संघाविरुद्ध झळकावले आहे.
डिसेंबर २०२० मध्ये त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध १०२ धावा, जानेवारी २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध १०९ धावा, एप्रिल २०२१ मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध १४० धावा आणि आता वेस्ट इंडिज संघाविरुद्ध नाबाद १२४ धावांची खेळी केली आहे.(Fawad Alam comeback after 10 years gap and scored 5 centuries)
सध्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात देखील पाकिस्तान संघ अडचणीत होता. पाकिस्तान संघाचे अवघ्या २ धावांवर ३ फलंदाज माघारी परतले होते. अशा कठीण परिस्थितीत फलंदाजीला येऊन फावदने बाबर आजम सोबत मिळून महत्वाची भागीदारी केली. बाबर आजमने या डावात ७५ धावांची खेळी केली तर फावदने नाबाद १२४ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताला हार्दिककडून खूप अपेक्षा, मात्र त्याने…”
काय सांगता! रूटने केलेल्या धावांपेक्षा २५ टक्के धावा करण्यात कोहली, रहाणे आणि पुजारा अपयशी





