वेलिंग्टन। कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपूष्टात आला. या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत धावबाद झाला. पण यामुळे रहाणेच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
झाले असे की आज भारताने 56 व्या षटकापासून 5 बाद 122 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी रहाणे आणि पंत फलंदाजी करत होते. पण टीम साऊथी गोलंदाजी करत असलेल्या 59 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर रहाणेने फटका मारला आणि एक धाव घेण्यासाठी धावला.
परंतू त्याचवेळी रहाणे आणि पंतमध्ये एकेरी धाव घेण्यावरुन गोंधळ उडाला. त्याचाच फटका पंतला बसला. बॅकवर्ड पाॅइंटला असणाऱ्या अजाज पटेलने थेड स्टंपवर चेंडू फेकत पंतला धावबाद केले.
यामुळे 64 वा कसोटी सामना खेळत असलेल्या रहाणेच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच असे झाले की तो फलंदाजी करत असताना त्याचा साथीदार धावबाद झाला आहे. तसेच रहाणे त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत आत्तापर्यंत कधीही स्वत: धावबाद झालेला नाही. त्यामुळे कसोटीमध्ये फलंदाजी करत असताना स्वत: किंवा साथीदार धावबाद होण्याची घटना रहाणेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली.
वेलिंग्टनला सुरु असलेल्या या सामन्यात पंत 19 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर लगेचच आर अश्विन(0), रहाणे(46) , इशांत शर्मा(5) आणि मोहम्मद शमी(21) बाद झाले. तर त्याआधी काल विराट कोहली(2), चेतेश्वर पुजारा(11), मयंक अगरवाल(34) हनुमा विहारी(7) आणि पृथ्वी शॉ(16) यांनी विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारताचा डाव 165 धावांवर संपुष्टात आला.
न्यूझीलंडकडून या डावात साऊथी आणि काईल जेमिसनने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.
https://twitter.com/Maha_Sports/status/1230835268011352064
https://twitter.com/Maha_Sports/status/1230829727180562433