मुंबई । कोरोना या विषाणूमुळे सर्वच क्षेत्र ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेला प्रचंड झळ पोहोचत आहे. यात क्रीडा क्षेत्राला सर्वात मोठा आर्थिक फटका बसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सर्वच स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
यंदाची १३ वी आयपीएल स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित करण्याच्या हालचाली बीसीसीआयने सुरू केल्या आहेत. ही स्पर्धा झाल्यास बीसीसीआयचे चार हजार कोटी रुपये वाचतील. माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांच्या मते, यंदा आयपीएलच्या स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्यास भारतातील सर्वात मोठी स्थानिक स्पर्धा रद्द करण्याची वेळ बीसीसीआयवर येऊ शकते.
गेल्या 86 वर्षांपासून रणजी करंडक स्पर्धा या नियमितपणे होत आहेत. यात कधी खंड पडला नाही. मात्र, यंदाची आयपीएल स्पर्धा ही रणजी करंडक स्पर्धेच्या वेळेत भरविण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे, असे झाल्यास यंदाची रणजी करंडक स्पर्धा रद्द होऊ शकतील, अशी भीती माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी व्यक्त केली आहे.
अतुल वासन म्हणाले की, यापूर्वी कधीच रणजी करंडक स्पर्धा कोणत्याही कारणासाठी रद्द करण्यात आली नाही. यंदाच्या वेळेस ही स्पर्धा रद्द केली तर अनेक संघांना याचे दुःख होऊ शकते. अतुल वासन म्हणाले की, यंदाची रणजी करंडक स्पर्धा होण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या देशात विमानसेवा बंद आहे. प्रत्येक संघाला विमानाने प्रवास करावा लागतो. विमानसेवा कधी सुरू होईल याची अद्याप माहिती नाही.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय देखील कारणामुळे आर्थिक संकटात सापडले आहे. अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएलची स्पर्धा घेऊ इच्छितो. अनेक स्थानिक क्रिकेटपटू रणजी करंडक स्पर्धा न झाल्यात अनेक स्थानिक क्रिकेटपटूंना याचा आर्थिक फटका बसू शकतो. स्थानिक क्रिकेटपटूंना विचार करून बीसीसीआयने अंतिम निर्णय घ्यावा. बीसीसीसीचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली हे काय निर्णय घेतील याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.