पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे झालेल्या टी20 विश्वचषकातील 29व्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला 6 विकेट्सने धूळ चारली. भारत आणि झिम्बाब्वे संघांविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये पराभव मिळवल्यानंतर हा पाकिस्तानचा पहिलाच विजय होता. पाकिस्तानने हा सामना जिंकला असला, तरीही कर्णधार बाबर आझम याच्या प्रगतीचा आलेख उतरंडीला लागला आहे. बाबर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील सरासरी घसरण्यास कारणीभूत ठरलाय.
या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 91 धावा चोपल्या. या कमी धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 13.5 षटकात 4 विकेट्स गमावत 95 धावा केल्या आणि सामना आपल्या नावावर केला. पाकिस्तानने हा सामना जिंकला असला, तरीही कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याची बॅट या सामन्यातही शांतच होती.
बाबर आझम याने या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना 5 चेंडूंचा सामना करताना फक्त 4 धावा केल्या. या चार धावा चौकाराच्या माध्यमातून आल्या होत्या. बाबरने मागील दोन सामन्यातही खास कामगिरी केली नव्हती. तो भारताविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात शून्य धावेवर तंबूत गेला होता, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही त्याला फक्त 4 धावा करता आल्या होत्या. या सर्वांचा फटका त्याच्या सरासरीवर पडला. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमीत कमी 10000 धावा करतानाची सरासरी घसरली आहे. तो 50 सरासरीच्या खाली आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमीत कमी 10000 धावा करताना सर्वाधिक सरासरी असणाऱ्या खेळाडूंमध्ये बाबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची 49.88 सरासरी आहे. या यादीत अव्वलस्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून त्याची सरासरी 53.94 इतकी आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी स्टीव्ह स्मिथ असून त्याची सरासरी 49.24, चौथ्या स्थानावर असलेल्या जॅक कॅलिसची सरासरी 49.10 आणि पाचव्या स्थानी असलेल्या जो रूटची सरासरी 49.03 इतकी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सरासरी (कमीत कमी 10000 धावा करताना)
53.94 सरासरी- विराट कोहली
49.88 सरासरी- बाबर आझम*
49.24 सरासरी- स्टीव्ह स्मिथ
49.10 सरासरी- जॅक कॅलिस
49.03 सरासरी- जो रूट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला सूर गवसला! नेदरलँड्सला 6 विकेट्सने धूळ चारत साकारला टी20 विश्वचषकातील पहिला विजय
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य