टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला होता. टी२० विश्वचषकादरम्यान अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. मात्र यादरम्यान स्पर्धेत काही वाद झाले, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जाणून घेऊ या टी२० विश्वचषकातील ते पाच मोठे वाद.
१. डेविड वॉर्नरचा दोन टप्पा चेंडूवर षटकार
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ४९ धावा केल्या होत्या. आपल्या फलंदाजीदरम्यान वॉर्नरने मोहम्मद हाफिजच्या दोन टप्पा चेंडूवर जोरदार षटकार ठोकला. वॉर्नरच्या या फटक्यावर सोशल मीडियावर दोन गट पडले. त्यावर अनेकांनी टीका केली, तर अनेकांनी वॉर्नरचे कौतुक केले.
त्याचवेळी गौतम गंभीरने वॉर्नरच्या या फटक्याबद्दल सांगितले की, वॉर्नरचा हा शॉट खेळ भावनेच्या विरोधात होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी वॉर्नरचे कौतुक केले होते.
२. क्विंटन डी कॉक आणि ब्लॅक लाइव्ह मॅटर चळवळ
टी२० विश्वचषकाच्या साखळी सामन्यादरम्यान, जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने सांगितले की, क्विंटन डी कॉक हा सामना खेळणार नाही आहे. पण सामना संपल्यानंतर डी कॉक मैदानात न उतरण्याचे कारण समोर आले आहे. खरं तर, डि कॉकने गुडघे टेकून ब्लॅक लाइव्ह मॅटर चळवळीला पाठिंबा देण्यास नकार दिला होता.
डी कॉकने नंतर सांगितले की त्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, क्रिकेट बोर्डाने ज्या प्रकारे दबाव निर्माण केला आहे ते त्याला आवडले नव्हते. यानंतर स्पर्धेतील पुढील सामन्यात डी कॉक खेळला आणि त्याने गुडघे टेकून या मोहिमेत भाग देखील घेतला.
३. मोहम्मद शमी झाला धर्मावरून ट्रोल
टी२० विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात ना भारतीय फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली ना गोलंदाजांना पाकिस्तान संघाची एकही विकेट काढता आली. टी२० विश्वचषकात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला.
या पराभवानंतर वेगवान गोलंदाज शमीबाबत सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाली. सोशल मीडियावर लोकांनी शमीच्या धर्मावर निशाणा साधला. शमीच्या धर्माबद्दल ट्रोल केल्याबद्दल, भारतीय कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला आणि त्याने ट्रोलर्सना फटकारले. भारताच्या माजी खेळाडूंनीही सोशल मीडियावर शमीला पाठिंबा दर्शवला.
४. वकार युनूसचे वादग्रस्त विधान
टी२० विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून विजय मिळवत चांगली सुरुवात केली. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान मैदानात नमाज अदा करताना दिसला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस म्हणाला की, या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे रिझवानने हिंदूंनी भरलेल्या स्टेडियममध्ये नमाज अदा केला. हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता.
त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतात त्याच्यावर बरीच टीका झाली होती. सोशल मीडियावरही लोकांनी त्याच्यावर जोरदार निशाणा साधला. टीकेनंतर वकार युनूसने माफी मागितली आणि चुकून हे वक्तव्य केल्याचे सांगितले. त्याने माफी मागत म्हटले होते, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. यामुळे जे दुखावले गेले, त्यांची मी माफी मागतो.
५. नाणेफेक वादविवाद
भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकली आणि सामना अधिकाऱ्याला सांगण्यापूर्वी त्याने आपला निर्णय जाहीर केला होता. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेविड गॉवर यांनी या वादावर आपले विधान केले होते की, मला या प्रकरणाची फार चिंता नाही.
या मुद्द्यावर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रशीद लतीफ म्हणाला की, नाणेफेकीच्या वेळी एक कर्णधार दुसऱ्या कर्णधाराला कसं सांगतो की त्याला काय करायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लक्ष्मणच्या दिमतीला येणार फ्लिंटॉफ-स्टार्क-हेजलवूडला घडवणारा दिग्गज; औपचारिक घोषणा बाकी
मनिष पांडेचा सुपर ओव्हरमध्ये विजयी षटकार; कर्नाटकसह हे संघ उपांत्य फेरीत दाखल
“आणखी एक विश्वचषक जिंकून निवृत्त होणार”; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितला ‘रिटायरमेंट प्लॅन’