भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अफलातून खेळ दाखवला. मात्र, त्यांना त्यांच्या कारकीर्दीचा शेवट चांगला करता आला नाही. इतकेच नव्हे, तर काही क्रिकेटपटूंना त्यांचा शेवटचा निरोपाचा सामनादेखील खेळायला मिळाला नाही. म्हणून त्यांनी शेवटचा सामना न खेळताच क्रिकेमधून निवृत्ती घेतली. आजच्या या लेखामध्ये आपण त्याच दिग्गज क्रिकेटपटूंच्या शेवटच्या मालिकेतील प्रदर्शनाविषयी जाणून घेऊया.
राहुल द्रविड
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) याने 2011-12 मध्ये त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळली होती. ऑस्ट्रेलियातील या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत राहुलचे प्रदर्शन खूपच साधारण होते. त्याने 4 सामन्यात 8 डाव खेळत एका अर्धशतकाच्या मदतीने फक्त 194 धावा केलेल्या. यावेळी त्याने सर्वाधिक 68 धावा पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केल्या होत्या. त्यानंतर मालिकेतील एकाही सामन्यात तो पन्नाशी पार करु शकला नाही.
सन 2012 मधील त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील प्रदर्शन चांगले नसले तरी, त्यापूर्वी 2011 मध्ये भारत संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी द्रविडने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3 शतके ठोकत दमदार 461 धावा केलेल्या. शिवाय, वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यावेळीही द्रविडने 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 319 धावा काढल्या होत्या. मात्र, त्या एका दौऱ्यामुळे भारतीय क्रिकेटची दीड दशकाहून जास्त काळ सेवा केलेल्या द्रविडच्या दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर चांगली होऊ शकली नाही.
व्हीव्हीएस लक्ष्मण
द्रविडप्रमाणे व्हीव्हीएस लक्ष्मणनेही 2011-12 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 12 ऑगस्ट 2012 ला लक्ष्मणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतलेली. लक्ष्मणने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. मात्र , लक्ष्मणला त्याच्या शेवटच्या कसोटी मालिकेत मात्र चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने सिडनी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात सर्वाधिक 66 धावांसह संपूर्ण मालिकेत फक्त 155 धावा केल्या. तर, त्यापुर्वीच्या 2011 मधील इंग्लंड दौऱ्यावरही लक्ष्मणला जास्त चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळी त्याने फक्त 2 अर्धशतके झळकावलेली. उर्वरित सामन्यांत त्याला 30पेक्षा जास्त धावा करता आल्या नव्हत्या. 2011 मध्येच वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी कोलकाता येथील दुसऱ्या कसोटीत त्याने नाबाद 176 धावांची शतकी खेळी केलेली. शिवाय त्याने एक अर्धशतकही केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियातील फ्लॉप शो नंतर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला.
वीरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मार्च 2013 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळलेला. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका झालेली. या मालिकेतील चेन्नई येथील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात सेहवागने अनुक्रमे 2 आणि 19 धावा केल्या होत्या. तर, पुढील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एका डावात फक्त 6 धावा केल्या. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला पुढील २ कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. सेहवागने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपला शेवटचा टी20 सामना खेळला, तर 2013मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला. त्यानंतर जवळपास दीड वर्षे आपल्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही म्हणून सेहवागने 20 ऑक्टोबर 2015 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली. आजही आपल्याला निवृत्तीचा सामना खेळायला न मिळाल्याचे दुःख सेहवाग वारंवार व्यक्त करत असतो.
युवराज सिंग
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने 10 जून, 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतलेली. त्याने जून 2017ला वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना खेळलेला. 2013 नंतर जवळपास 4 वर्षांनी वनडेत पुनरागमन करणाऱ्या युवराजने 2017 मध्ये वनडेत दमदार कामगिरी केली होती. कटक येथील दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध 150 धावांची खेळी करत भारताला 15 धावांनी तो सामना जिंकून दिला होता. भारताने इंग्लंडविरुद्धची ती तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1ने खिशात घातली होती. मात्र, जून 2017मधील वेस्ट इंडीज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात युवराजने 4, तर दुसऱ्या सामन्यात 19 धावा केल्या होत्या. पुढील तिसऱ्या सामन्यातही त्याला फक्त 39 धावाच करता आल्या. त्यामुळे त्याला उर्वरित 2 वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही आणि तो त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. दोन वर्ष दीर्घ वाट पाहिल्यानंतरही संधी न मिळाल्याने शेवटी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. पुढे काही वर्ष फ्रँचायजी क्रिकेट खेळून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ 4 दिग्गज जगात चमकले, पण क्रिकेटच्या पंढरीत ठरले अपयशी; यादीत दोन भारतीयांचा समावेश
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच