---Advertisement---

‘कॅप्टन’ विराटची कमाल! भारताच्या सर्वात मोठ्या ६ विजयांपैकी ५ विजय कोहलीच्या नेतृत्वातील, वाचा सविस्तर

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 3:11 PM
Team India (Virat Kohli, R Ashwin, Rohit Sharma)
---Advertisement---

चेन्नई। एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकताच दुसऱ्या कसोटी सामना पार पडला. या सामन्यात मंगळवारी (१६ फेब्रुवारी) भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. याविजयाबरोबरच भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. याबरोबरच भारताने या विजयासह एक मोठा विक्रमही केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवण्याची भारताची ही एकूण सहावी वेळ होती. याआधी भारताने ५ वेळा ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवला होता. तसेच धावांच्या तुलनेतील भारताचा हा ५ वा सर्वात मोठा कसोटी विजय आहे.

भारताचे मोठे कसोटी विजय 

भारताने कसोटीमध्ये सर्वात मोठा विजय २०१५ साली दिल्लीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी मिळवला होता. त्यानंतर २०१६ साली न्यूझीलंड विरुद्ध इंदोर येथे ३२१ धावांनी भारताने विजय मिळवला होता. तसेच मोहाली येथे २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२० धावांनी मिळवलेला विजय या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजविरुद्ध २०१९ साली नॉर्थ साऊंड येथे ३१८ धावांनी मिळवलेला विजय आहे. हा भारताचा परदेशातील सर्वात मोठा विजयही आहे.

त्यानंतर आता धावांच्या तुलनेतील भारताच्या सर्वात मोठ्या विजयांच्या यादीत मंगळवारी इंग्लंडविरुद्ध ३१७ धावांनी मिळवलेल्या विजयाचा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ भारताने २०१७ साली गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध ३०४ धावांनी मिळवलेल्या विजयाचा समावेश आहे.

विशेष म्हणजे यातील २००८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवेलेला विजय सोडला तर अन्य ५ विजय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवले आहेत.

इंग्लंडविरुद्ध सर्वात मोठा विजय-

मंगळवारी मिळवलेला विजय हा भारताचा इंग्लंड विरुद्धचा धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी भारताला इंग्लंडविरुद्ध ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी कसोटी सामना जिंकता आला नव्हता.

या सामन्यात भारताने इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला १६४ धावाच दुसऱ्या डावात करता आल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईन अलीने सर्वाधिक १८ चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. तसेच जो रुटने ३३ धावांची खेळी केली. भारताकडून या डावात अक्षर पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी भारताने या सामन्यात पहिल्या डावात रोहित शर्माच्या दीडशतकी (१६१) तसेच अजिंक्य रहाणे (६७) आणि रिषभ पंतच्या (५८*) अर्धशतकाच्या जोरावर ३२९ धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवर रोखले होते. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळवली होती. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताकडून आर अश्विनने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर भारताचा दुसरा डाव ८५.५ षटकात २८६ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारत पहिल्या डावातील १९५ धावांची आघाडीसह ४८१ धावांनी पुढे असल्याने भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले. भारताकडून दुसऱ्या डावात आर अश्विनने १०६ धावांची शतकी खेळी केली. तसेच विराट कोहलीने ६२ धावांची खेळी केली. या डावात इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीचने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर

उडा दे गिल्ली..! डॅनियल लॉरेन्सनंतर मोईन अलीची शिकार, पाहा कशी उडवली रिषभ पंतने दांडी

बिग ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूला पाठवले मायदेशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---